आता गणिताची भीती दूर होणार!

आता गणिताची भीती दूर होणार!

प्रशिक्षणार्थ्यांचा दिक्षांत समारोह

शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणित या विषयाची आवड निर्माण व्हावी, यासाठी आयआयटी मुंबई आणि RMSA (MH) राष्ट्रिय माध्यमिक शिक्षण अभियान (महाराष्ट्र) यांनी संयुक्तपणे राबवलेल्या QIME (क्वालिटी इंप्रूव्हमेंट इन मॅथ एज्युकेशन) नावाच्या उपक्रमाला यश आले आहे. या उपक्रमाद्वारे महाराष्ट्रातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांची एक बॅच तयार करण्यात आली. या उपक्रमाची सुरुवात २०१५ मध्ये करण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण महाराष्ट्र सरकारकडून पूर्णत: मोफत होते. या प्रशिक्षणासाठी जेवण, राहण्याची सोय तसेच प्रवासाचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आला. यात विशेषत: महाराष्ट्र बोर्डाच्या ८ वी आणि ९ वीच्या गणित विषयाचे प्रशिक्षण देण्यात आले. या उपक्रमातल्या दुसऱ्या बॅचची सुरुवात जुलैमध्ये सुरु होणार आहे. दुसऱ्या बॅचच्या प्रवेश परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. इच्छुक शिक्षक https://goo.gl/forms/pVgrUtJXIKgmniwx1 या वेबसाईटवरुन ऑनलाईन अर्ज भरु शकतात. अर्ज भरण्याची अंतीम तारिख २ जुलै असून प्रवेश परिक्षा १४ जुलै २०१८ ला घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता या उपक्रमाअंतर्गत आणखी ३०० इच्छुक शिक्षकांना प्रशिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.

तीन निकषांच्या आधारे प्रशिक्षण

८ वी व ९ वीच्या गणित विषयाच्या अभ्यासक्रमाचे संपूर्ण प्रशिक्षण पुढिल तीन निकषांच्या आधारे देण्यात आले.

१) निरीक्षण आणि अन्वेषण (Observe and Explore)
यात विषय समजून घेणे आणि त्याची आवड निर्माण करणे या मुद्द्यावर भर देण्यात आला.

2) परिभाषित आणि सिद्ध करणे (Define and Prove)
यात गणितीय ज्ञान देण्याबरोबरच ते सोप्या पद्धतीने शिकवण्याच्या काही पद्धती शिकवण्यात आल्या.

3) वापर आणि मूल्यमापन (Apply and Evaluate)
गणिताचा वास्तविक जीवनात वापर करुन त्याचे मूल्यमापन कसे करावे? हे शिकवण्यात आले.

उपक्रमासाठी खास तयार करण्यात आलेला लोगो

प्रशिक्षण प्रक्रिया

यासाठी २०१६-१७ असा १ वर्षाचा प्रशिक्षणाचा काळ ठरवण्यात आला. ही प्रशिक्षणाची प्रक्रिया काही टप्प्यांमध्ये पार पडली.

प्रशिक्षणाचा पहिला टप्पा

या प्रशिक्षणासाठी सर्वप्रथम महाराष्ट्रातील इच्छुक शिक्षकांची प्रवेश परिक्षा घेण्यात आली. प्रवेश परीक्षा पास केलेल्यांपैकी एकून ३६ जिल्ह्यातून प्रत्येकी १० या प्रमाणे, ३६० शिक्षकांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली.

प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा

निवड करण्यात आलेल्या शिक्षकांना १ वर्षाचे प्रशिक्षण देण्यात आले. एक वर्षामध्ये सलग तीन दिवसांचे असे एकून १० सेशन्स घेण्यात आले. प्रशिक्षण लोणावळ्यातील एका शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात देण्यात आले.

प्रशिक्षणाचा तिसरा टप्पा

प्रशिक्षण संपल्यानंतर त्यांची परीक्षा घेण्यात आली. त्त्यात उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना मास्टर ट्रेनर्स कोर्स सर्टिफिकेट देण्यात आले. एकूण ३०० शिक्षकांनी या सर्टिफिकेटसाठी परीक्षा दिली. त्यातून २७३ शिक्षक उत्तीर्ण झालेत. उत्तीर्ण झालेल्या या २७३ शिक्षकांनी पुढे १२०० शिक्षकांना प्रशिक्षण दिले.

उपक्रमाचे प्रमुख- इंदर के राणा. प्राध्यापक, गणित विभाग,आयआयटी मुंबई

सामान्यत: ग्रामिण भागातील विद्यार्थी गणित विषयाला जास्त घाबरतात. त्यांच्या मनातील भीती दूर करुन, हा विषय इंटरेस्टींग कसा करता येईल हा यामागचा मुख्य हेतू होता. 

इंदर के राणा ,गणित विभागाचे प्राध्यापक,आयआयटी मुंबई

महाराष्ट्र सरकारने या उपक्रमाचे परिणाम बघितल्यानंतर पुढील दोन वर्षे हा उपक्रम सतत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमाद्वारे एक बॅच तयार झाली असून आणखी एक ते दोन बॅच तयार करण्याचे उद्दीष्ट असल्याचेही प्राध्यापक इंदर राणा यांनी सांगितले. पुढील काळात आणखी ६०० प्रशिक्षक तयार करण्याचे लक्ष्य असल्याचेही ते म्हणाले.

First Published on: June 30, 2018 10:30 AM
Exit mobile version