कर्जत आगाराचा मनमानी कारभार

कर्जत आगाराचा मनमानी कारभार

एसटीच्या कर्जत आगाराची कर्जत-माथेरान मिनी बस सेवा येथे येणार्‍या पर्यटकांबरोबर स्थानिकांनाही सोयीची ठरते, पण गेल्या काही महिन्यांपासून अचानक फेर्‍या कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे कमालीचे हाल होत आहेत. आगाराच्या या मनमानीबद्दल चीड व्यक्त केली जात आहे. अनेकदा संघर्ष केल्यानंतर २००८ सालापासून ही सेवा सुरू करण्यात आली होती.

कर्जत-माथेरान मार्गावर जाणार्‍या व येणार्‍या प्रत्येकी पाच याप्रमाणे दहा फेर्‍या होणे क्रमप्राप्त असताना आगार प्रमुखांच्या नियोजनशून्य कारभारामुळे सोमवारपासून (12 ऑगस्ट) येथून कर्जतला जाणारी सायंकाळी ६ वाजताची फेरी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे दररोज या बसने प्रवास करणार्‍या जवळ-जवळ ४० ते ४५ प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यापैकी एका प्रवाशाने आगारात दूरध्वनी केला. मात्र त्याला पलिकडून बेजबाबदार उत्तर ऐकावे लागले.

मध्यंतरीच्या अतिवृष्टीमुळे नेरळ-माथेरान रेल्वे मार्गाची वाताहत झाल्याने माथेरानची मिनी ट्रेन सेवा अनिश्चित काळासाठी बंद आहे. तर दररोज ये-जा करण्यासाठी टॅक्सी सेवा ही सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नाही. त्यामुळे मिनी बस हा सर्वोत्तम पर्याय ठरत आहे. मध्यंतरी कर्जत-माथेरान बस सेवेमुळे कर्जत बस आगार संपूर्ण रायगड जिल्ह्यात क्रमांक एकचे नफ्यात असणारे आगार ठरले होते.

नियोजित वेळेवर बस न आल्याने कर्जत आगारात दूरध्वनीवरून विचारणा केली असता चालक आजारी असल्यामुळे बस येणार नाही, तुम्ही आजच्या दिवस चालवून घ्या, असे बेजबाबदार उत्तर दिले गेले.
-सीताराम कुंभार, प्रवासी

माथेरान बस चालविण्यासाठी फक्त तीन-चार निष्णात चालक असून, कामावर असलेल्या चालकाची अडचण निर्माण झाल्याने आगारातून बस पाठवली नाही.
-एस. पी. यादव, व्यवस्थापक, कर्जत आगार

First Published on: August 14, 2019 1:36 AM
Exit mobile version