‘माथेरानची राणी’ वर्षभरासाठी बंद; पर्यटकांमध्ये नाराजी

‘माथेरानची राणी’ वर्षभरासाठी बंद; पर्यटकांमध्ये नाराजी

माथेरान येथील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असणारी माथेरान मिनी ट्रेन अर्थात माथेरानची राणी वर्षभराकरिता बंद ठेवण्यात येणार आहे. जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने नेरळ ते माथेरान या दरम्यान असणाऱ्या २१ ठिकाणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्याच्या कामकाजाकरिता बराच कालावधी लागणार आहे. यासोबतच कामकाज आणि दुरूस्तीसाठी साधारण १८ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पर्यटकांना ‘माथेरानची राणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिनी ट्रेनची मज्जा वर्षभर घेता येणार नाही.

पर्यटकांमध्ये नाराजी

जुलै महिन्यात माथेरानमध्ये सर्वाधिक पाऊस झाल्याने नेरळ ते माथेरान मार्गावरील ट्रॅकमधील खडी या पावसाच्या पाण्याने वाहून गेली होती तसेच ट्रॅक सरकणे यांसोबत या मार्गावर दरड कोसळणे अशाप्रकारचे नुकसान झाले होते. या कारणामुळे दरवर्षी नेरळ ते अमन लॉज मिनी ट्रेन सेवा पावसाळ्यात बंद ठेवली जाते. मात्र यंदाच्या पावसामुळे अमन लॉज ते माथेरान शटल सेवा देखील बंद ठेवण्यात आली होती. मात्र गेल्या जुलै महिन्यात झालेल्या मोठ्या प्रमाणातील पावसामुळे नेरळ ते अमन लॉज दरम्यान अनेक समस्या निर्माण झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्याच्या दुरूस्तीकरिता पर्यटकांसाठी माथेरान मिनी ट्रेन वर्षभर बंद ठेवण्यात येणार आहे. परंतु, सर्वात आधी नेरळ ते माथेरान दरम्यान असलेली माथेरान ते अमन लॉज शटल सेवा सुरू करण्यात येणार आहे.

या मिनी ट्रेनच्या दुरूस्तीकरिता रेल्वे बोर्डाकडे दुरूस्तीसाठी लागणारा निधीचा प्रस्ताव पाठवला जाणार असून नेरळ ते अमन लॉज या मार्गाचे नेमण्यात आलेल्या एका समितीमार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यानुसार दुरूस्तीचे काम सुरू करण्यात येणार आहे.

First Published on: August 28, 2019 8:28 AM
Exit mobile version