Sunil Mehta : मेहता पब्लिशिंग हाऊसचे एमडी सुनील मेहता यांचे निधन

Sunil Mehta : मेहता पब्लिशिंग हाऊसचे एमडी सुनील मेहता यांचे निधन

मेहता पब्लिशिंग हाऊस संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. याआधी किडनी स्टोनवरील उपचारांसाठी त्यांना पूना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान मल्टीपल ऑर्गन फेल्युअरने त्यांचे निधन झाल्याचे कारण समोर आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पण दुपारी ४ वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुनील मेहता यांच्या पार्थिवावर गुरूवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील. प्रकाशन व्यवसायामध्ये आधुनिकीकरणासाठी पावल उचलण्यामध्ये त्यांचे नाव अग्रेसर होते. सध्याच्या पिढीतील अनेक ख्यातनाम व्यावसायिकांना मेहता पब्लिकेशनच्या माध्यमातून ओळख मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. समाजातील अनेक विषयांना स्पर्श करणाऱ्या लेखकांना लिहित करण्यासाठी या संस्थेने संधी दिली. त्यामुळेच अनेक दर्जेदार साहित्याची निर्मिती करणारे लेखक घडवण्याचे श्रेय या संस्थेकडे जाते. अनेक लेखकांना संधी देऊन दर्जेदार साहित्य घडवण्याचे काम मेहतांच्या नेतृत्वात झाले. वाचकांना समृद्ध करणारा प्रकाशक म्हणून त्यांची ओळख होती. मेहता पब्लिकेशनची पुस्तके ऑनलाईन पुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.

कोण आहेत सुनील मेहता ?

१९८६ साली त्यांनी आपल्या वडिलोपार्जित प्रकाशन व्यवसायात पाऊल ठेवले. पारंपारिक प्रकाशन व्यवसायाचे डिजिटायजेशन करण्याचे श्रेय हे सुनील मेहतांना जाते. हिंदी, बंगाली, कन्नड, गुजराती आणि इंग्रजी अशा विविध भाषांमधील पुस्तकांचे मराठी अनुवाद त्यांनी प्रकाशित केले. कोरियन आणि जपानी भाषेतील पुस्तकांचे मराठी आणि इंग्रजी अनुवादही प्रकाशन करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.

सर्व प्रकारच्या श्रेणीली दर्जेदार डिजिटल पुस्तके प्रकाशित करणारे असे मेहता पब्लिशिंग हे एकमात्र पब्लिशिंग हाऊस आहे. एकट्या महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात त्यांनी इंग्रजी पुस्तकांचा व्यवसाय वाढवला. मराठी वाचकांना परदेशी भाषांमधील पुस्तके वाचण्यास मिळावी म्हणून त्यांनी परदेशी भाषांमधील अनेक पुस्तकांचे अनुवाद प्रकाशित केले होते.

रणजित देसाई, वि.स. खांडेकर, व्यंकटेश माडगूळकर, आनंद यादव, व.पु. काळे, शिवाजी सावंत, शांता शेळके, शंकर पाटील अशा दिग्गजांची पुस्तकेही त्यांनी प्रकाशित केली. रविंद्रनाथ टागोर, एपीजे अब्दुल कलाम, नारायण मूर्ती, सुधा मूर्ती, अरूण शौरी, गुलजार, किरण बेदी, अरूंधती रॉय, सचिन तेंडुलकर, शोभा डे यांचीही पुस्तके त्यांनी प्रकाशित केली.


 

First Published on: January 12, 2022 5:50 PM
Exit mobile version