विठ्ठल चरणी दुग्धाभिषेक करून आंदोलनाची सुरूवात

विठ्ठल चरणी दुग्धाभिषेक करून आंदोलनाची सुरूवात

शेतकरी आक्रमक, दूध रस्त्यावर ओतले

‘विठ्ठला सरकारला सुबुद्धी दे’ अशा शब्दात पंढपूर येथे विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालून स्वाभिमानी शेतकरी संघनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनांची सुरूवात केली. प्रतिलिटर ५ रूपये अनुदान मिळावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची हाक दिली आहे. रविवारी मध्यरात्रीपासून मुंबईचे दुध रोखण्याच्या निर्णयामुळे मुंबईमध्ये दूधाची टंचाई जाणवणार हे नक्की! दुधाचा उत्पादन खर्च ३५ रूपये आणि दर मिळतो १७ रूपये, पांडुरंगा महाराष्ट्रातील तमाम दूध उत्पादक निम्म्या दराने दूध विकतोय आता तूच यामध्ये लक्ष घाल असे साकडे यावेळी राजू शेट्टी यांनी विठ्ठलाला घातले. दुध दरावरून आक्रमक झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी टँकर अडवले. शिवाय, दूध रस्त्यावर ओतले तर पुण्यात दुध संघाच्या ५ गाड्या फोडण्यात आल्या आहेत.

राजू शेट्टी आक्रमक

सरकारने निर्णय घ्यावा, नाही तर येत्या आषाढी वारीला मुख्यमंत्री पंढरपुरात येतात त्यावेळी काय करायचे ते पाहू असा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला आहे. आंदोलन बेमुदत असेल, मुंबईला थेंबभरही दूध जाणार नाही. दूध फुकट घ्या. पण, विकणार नाही. मध्यरात्रीपासून आंदोलन सुरू होणार म्हटल्यावर आमच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठव, अटक करा, धमकी द्या असे माकड चाळे केल्याने आंदोलन आधीच सुरू झाले. अशा शब्दात राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली.

मध्यरात्रीपासून आंदोलन

रविवारी मध्यरात्रीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी दूधाचे टँकर अडवले.तर राजू शेट्टी यांनी पंढरपूर येथे दुग्धाभिषेक करून आंदोलनाला सुरूवात केली. राज्यातील अनेक भागांमध्ये पोलिसांनी स्वाभिमानीसह किसान सभा आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या. तर काही कार्यकर्कत्यांना ताब्यात घेण्यात आले. आंदोलनामुळे शेतकरी दूध घालणार नाहीत. मुंबई, पुण्याकडे जाणारे टँकर अडवले गेले. यावेळी महिला कार्यकर्त्या देखील आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. तर गुजरातमधून येणारा दूध पुरवठा देखील रोखण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. हार्दिक पटेलने देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आंदोलनाची सुरूवात पश्चिम महाराष्ट्रातून होणार असली तरी आंदोलन राज्यव्यापी करण्यात येणार आहे.

First Published on: July 16, 2018 8:00 AM
Exit mobile version