ज्यांना घरातून बाहेर काढले, त्यांच्यावर मी काय बोलू? ; अकबरुद्दीन ओवेसींची राज ठाकरेंवर टीका

ज्यांना घरातून बाहेर काढले, त्यांच्यावर मी काय बोलू? ; अकबरुद्दीन ओवेसींची राज ठाकरेंवर टीका

औरंगाबादच्या दौऱ्यावर असलेले एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर कडवट टिका केली आहे. यावेळी राज ठाकरे यांच्यावर टिका करताना ओवेसींची जीभ घसरली. कुत्रा भुंकतोय, भुंकू दे. सिंहाचे काम डरकाळी फोडणे आहे, त्यामुळे तुम्ही कुणाच्या जाळ्यात अडकू नका, अशा शब्दात ओवेसी यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता टिका केली.

अकबरुद्दीन ओवेसी यांनी कार्यकर्त्यांसह औरंगाबादमधील धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर त्यांची शहरात सभा पार झाली. यावेळी लवकरच मोठी सभा घेऊन उत्तर देऊ. जागा, वेळ मी ठरवेल आणि तुला उत्तर देईल. आता मी कुणाला उत्तर द्यायला आलो नाही. माझा तरी एक खासदार आहे तू तर बेघर आहे, तुला घरातून काढले आहे, ज्यांना घरातून बाहेर काढले, त्यांच्यावर मी काय बोलू? मी त्यांच्यावर बोलावे, ती त्यांची लायकी नाही, अशा कडवट शब्दात ओवेसींनी राज ठाकरे यांच्यावर टिका केली. आम्ही कुणाला घाबरणारे नाही. तुम्ही आम्हाला घाबरवणार आणि आम्ही घाबरणार हे शक्य नाही, असा इशाराही त्यांनी राज ठाकरेंना दिला.

ओवेसी म्हणाले की, महाराष्ट्रातल्या कोणत्याही मुस्लिमांना अकबर ओवेसी विसरणार नाही.  एमआयएमची ताकद नसतानाही २०१३-१४ मध्ये जंगी स्वागत करण्यात आले. प्रवास कठीण होता, पण महाराष्ट्रात लोक जोडले गेले आणि महाराष्ट्रातील मुसलमानांची मने जिंकली.

मुस्लिम समाजातील तरुणांनी कुणाच्याही भडकावण्याला बळी पडू नये. आम्ही त्यांना योग्य वेळी उत्तर द्यायला खंबीर आहोत. असेही आवाहन त्यांनी तरुणांना केले.  देशात द्वेष पसरवला जातोय. पण मी प्रेम पसरवतो.  इस्लाम आधी नाही संपला आता कोण संपवणार? असाही सवाल त्यांनी यावेळी केला. भाषणाच्या शेवटी ओवेसींनी हिंदुस्थान झिंदाबादच्या  घोषणा दिल्या.  हा देश जेवढा त्यांचा आहे, तेवढा माझा पण आहे. ना ही त्यांची जहागीर आहे, ना माझी आहे. आपण सगळे प्रेमाने राहू, देशाला पुढे घेऊन जाऊ, असेही ओवेसींनी म्हटले.

First Published on: May 12, 2022 8:21 PM
Exit mobile version