मशीद उघडायला निघालेले एमआयएमचे खासदार जलील पोलिसांच्या ताब्यात

मशीद उघडायला निघालेले एमआयएमचे खासदार जलील पोलिसांच्या ताब्यात

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी औरंगाबादमधील मशीद उघडून नमाज अदा करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानुसार ते औरंगाबादेतील शहागंज मशिदीत प्रवेश करणार आहेत. त्यासाठी ते कार्यालयापासून चालत रवाना झाले असताना वाटेत पोलिसांनी अडवत त्यांना ताब्यात घेतले. मात्र, तरीही जलील आंदोलनावर ठाम असून आपण मशिदी उघडणारच, असे आव्हान त्यांनी राज्य सरकारला दिले आहे.

इम्तियाज जलील काही कार्यकर्त्यांसह शहागंज मशिदीत जाऊन नमाज अदा करणार होते. त्यांनी कार्यालयापासून चालत आंदोलनाला सुरुवात केली होती. मात्र, वाटेतच औरंगाबाद पोलिसांनी त्यांना रोखले. त्यानंतर जलील यांना पोलिसांच्या गाडीत बसवून ताब्यात घेण्यात आले. इम्तियाज जलील यांना औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. एमआयएमच्या अनेक कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे जलील यांच्या आंदोलनामुळे मशिदकडे येणारा मुख्य रस्ता बंद करण्यात आला होता. या रस्त्यावर कोणलाही परवानगी नव्हती. इम्तियाज जलील यांच्या ऑफिसबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जलील यांनी नमाज पडण्यासाठी जाऊ नये यासाठी पोलिसांनी अनेक प्रयत्नही केले. त्यांच्या कार्यालयाबाहेर शेकडो पोलिसांचा बंदोबस्त होता.

दरम्यान, मंगळवारी इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमधील खडकेश्वर मंदिर उघडण्यासाठी निवेदन देणार असल्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यात मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. बराच काळ औरंगाबादमधील वातावरण देखील तणावपूर्ण झाले. त्यामुळे औरंगाबाद शहरात कडक पोलीस बंदोबस्त होता.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये अद्याप धार्मिक स्थळांना उघडण्याची परवानगी मिळालेली नाही. असे असतानाही इम्तियाज जलील यांनी केलेल्या या घोषणेमुळे पोलीस प्रशासन आणि एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात होती.

First Published on: September 3, 2020 6:55 AM
Exit mobile version