कोल्हापूरात फडकणार परदेशातू आयात केलेल्या कापडाचा तिरंगा, मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

कोल्हापूरात फडकणार परदेशातू आयात केलेल्या कापडाचा तिरंगा, मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

कोल्हापूरच्या पोलीस उद्यानात अभारण्यात आलेला 303 फूट उंचावरील राष्ट्रध्वज काल फडकवण्यात आला. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील व विशेष निमंत्रित ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्रीमती मीनाताई गुरव, वसंतराव मानेंच्या प्रमुख उपस्थित होते. यावेळी पोलीस विभागाने राष्ट्रध्वजाला सलामी दिली.

न फाटणाऱ्या कापडाचा ध्वज परदेशातून मागवण्यात येणार- 

देशातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच ध्वज हा कोल्हापूरमध्ये आहे. ध्वज उंचावर असल्याने त्याची  काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे काही कालावधीसाठीच हा ध्वज डौलाने फडकला आहे. या ध्वजाचा दुरुस्तीचा खर्चही अधिक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वर्षभर तिरंगा डौलाने फडकवण्यासाठी 303 फूट उंचीवरही न फाटणाऱ्या कापडाचा ध्वज परदेशातून मागवण्यात येणार असल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्यामुळे ध्वज वर्षभर पोलिस उद्यानात डौलाने फडकत राहणार आहे. या कापडाची किंमत सुमारे साडे चार लाख रुपये आहे.

मेहनत घेतलेल्या चमुचे केले कौतुक  –

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसेनानींनी प्राणाची आहुती दिली. अनेकांच्या त्याग, बलिदानातून देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा शासकीय पातळीवरच न राहता लोकसहभागातून राबविण्यावर भर देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले. याचसाठी राष्ट्रध्वज उभारण्यासाठीच्या नियमावलीत बदल करण्यात आले, असे सांगून कोल्हापूर मधील पोलीस उद्यानातील 303 फूट उंचीवरील राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह मेहनत घेतलेल्या चमुचे त्यांनी कौतुक केले. यावेळी बोलताना पर्यटन क्षेत्रासह कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले.

First Published on: August 14, 2022 3:54 PM
Exit mobile version