शिवकाळातील झाड वाचविण्यासाठी गडकरींनी हायवेचा नकाशाच बदलला

शिवकाळातील झाड वाचविण्यासाठी गडकरींनी हायवेचा नकाशाच बदलला

सांगलीतील ४०० वर्षांपुर्वीचा महाकाय वटवृक्ष

सांगली जिल्ह्यातील भौसे येथील तब्बल ४०० वर्ष जुने शिवकाळातील वटवृक्ष तोडू नये यासाठी स्थानिकांसह अनेक पर्यावरण प्रेमींनी विरोध केला होता. या विरोधानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी चक्क प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाचा नकाशाच बदलण्याचे आदेश दिले आहेत. प्रचंड विरोध झाल्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील हे झाड वाचविण्यासाठी पुढाकार घेत नितीन गडकरींना पत्राद्वारे झाड न तोडण्याची मागणी केली होती. या मागणीला यश मिळाले आहे.

रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ च्या चौपदरीकरणाच्या कामासाठी मिरज ते पंढरपूर दरम्यान येणाऱ्या मौजे भोसे गावतील यल्लमा मंदिराशेजारी हे ४०० वर्षांपुर्वीचे झाड आहे. हे वटवृक्ष तोडण्याची बातमी कळल्यानंतर अनेक निसर्गप्रेमींनी या वटवृक्षाभोवती चिपको आंदोलन देखील केले होते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी केलेल्या मागणीची दखल घेत महामार्ग प्राधिकारणाने हे झाड वाचवण्याचा निर्णय घेतला आहे.

भौसे येथून जाणाऱ्या महामार्गाची रचना थोडीशी बदलण्यात आलेली असून बायपास रस्त्याला पर्याय शोधण्याचा निर्णय हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया (NHAI) आणि दिलीप बिल्डकॉन या रस्ते बांधणी कंपनीने घेतला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्याबाबत निर्देश दिले होते. हे झाड वाचविल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन नितीन गडकरींचे आभार व्यक्त केले आहेत.

मिरज – पंढरपूर मार्गावरील हे अवाढव्य वटवृक्ष शेकडो वर्ष यामार्गावरुन जाणाऱ्या पंढरीच्या वारकऱ्यांना सावली देण्याचे काम करत आहे. या महाकाय वटवृक्षाचा विस्तार जवळपास ४०० चौ.मी. इतका व्यापक आहे. हे वटवृक्ष इतिहासाचा ठेवा तर आहेच, शिवाय वटवाघूळ आणि दुर्मिळ प्रजातींच्या मिळून एकूण ७०० प्रजाती या झाडावर निवास करतात, अशी माहिती येथील निसर्गप्रेमी ग्रामस्थांनी दिली. दरवर्षी पौष महिन्यात यल्लमा मंदिरात यात्रा भरते, त्यावेळी दुरवरुन आलेले भाविक याच झाडाखाली निवास करतात.

First Published on: July 25, 2020 5:48 PM
Exit mobile version