नोव्हेंबर अखेरपर्यंत महाराष्ट्र पूर्णत: सुरु – वडेट्टीवार

नोव्हेंबर अखेरपर्यंत महाराष्ट्र पूर्णत: सुरु – वडेट्टीवार

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन राज्यातील ठाकरे सरकार हळूहळू शिथिल करत असून राज्यात आता अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. गेले आठ महिने बंद असेलेली चित्रपट आणि नाट्यगृहे सुरु करण्याचा निर्णय बुधवारी राज्य सरकारने घेतला. दरम्यान, राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठे विधान केले आहे. नोव्हेंबर अखेरपर्यंत महाराष्ट्र पूर्णत: सुरु होईल अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

“राज्यातील निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत असून या महिनाअखेर राज्यातील स्थिती पूर्वपदावर आणली जाईल. डिसेंबरपासून सर्व जनजीवन पूर्वपदावर येईल,” असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. मात्र, मुंबईची लोकल सेवा कधी सुरु होणार यावर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी मुंबई लोकल सुरु करण्यासंबंधी लवकरच राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास व्यक्त केला. विजय वडेट्टीवार यांनी मुंबई लोकल बाबत बोलताना केंद्रावर टीका केली. वडेट्टीवार यांनी केंद्र आणि रेल्वेवर निशाणा साधताना “रेल्वे सुरु करण्यासंबंधी खरे तर आमची चार पत्रे होती. त्याला परवानगी न देता काही त्रुटी काढल्या जात आहे. सरकार आणि रेल्वेला क्रेडिट घ्यायचे असेल तर त्यांनी घ्यावे. आम्ही रेल्वे विभागाला तीन पत्रे पाठवली आहेत. त्यावर सुरक्षेसाठी काय करणार, गर्दी टाळण्यासाठी काय करणार आम्हाला विचारत आहेत. आम्ही सगळी यंत्रणा राबवत आहोत. राज्य सरकार याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेईल,” असे वडेट्टीवार म्हणाले.

चित्रपटगृह, नाट्यगृहांना राज्यसरकारची परवानगी

कोरोना रोखण्यासाठी गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेली चित्रपट आणि नाट्यगृहे आजपासून (गुरुवार) खुली होणार आहेत. दिवाळी जवळ आल्याने चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी या क्षेत्रांतून करण्यात येत होती. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे ५० टक्के प्रेक्षक क्षमतेच्या मर्यादेत सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मराठी रंगभूमीदिनी नाट्यगृहे सुरू होत असल्याबद्दल या क्षेत्रातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

 

First Published on: November 5, 2020 10:46 AM
Exit mobile version