आमदार बनला ट्रकचालक; वसुलीबाज पोलिसांना पळता भुई थोडी

आमदार बनला ट्रकचालक; वसुलीबाज पोलिसांना पळता भुई थोडी

पोलिसांकडून सुरू असलेल्या आर्थिक लुटीचा पर्दाफाश करण्यासाठी आमदाराने स्वतः ट्रकचालक बनून संपूर्ण स्टिंग ऑपरेशन कॅमेऱ्यात शूट केलं. या स्टिंगमध्ये पोलिसांनी स्वतः आमदाराकडेच पैशांची मागणी करत शिवीगाळ केली. ट्रकचालक खुद्द आमदार असल्याचं समजल्यानंतर मात्र पोलिसांना पळता भुई थोडी झाली. एरव्ही चोरांच्या मागे पळणारे पोलीस स्वतःच फरार झाले.

चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात पोलीस ट्रकचालकांकडून जबरदस्तीने आर्थिक लूट करत असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या प्रकाराची खातरजमा करण्यासाठी चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी वेषांतर करत स्टिंग ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी स्वतः अजजड ट्रक चालवत कन्नड घाटात नेला, त्याठिकाणी असलेल्या पोलिसांनी त्यांच्याकडे ५०० रुपयांची मागणी केली.

आमदार चव्हाण यांनी थोडे कमी पैसे घ्या, असं सांगत ५०० रुपये पोलिसाच्या हाती दिले. त्यानंतर उर्वरित पैसे परत मागताच या पोलिसाने ते देण्यास नकार दिला. आमदार चव्हाण यांनी बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांना मदतीसाठी बोलवत पैसे घेतलेला पोलीस उर्वरित पैसे देत नसल्याची तक्रार केली. तेव्हा त्यातील एका पोलिसाने थेट शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर संतापाचा कडेलोट झालेल्या आमदार चव्हाण यांनी ट्रकखाली उतरून थेट पोलिसांशी बोलायला सुरूवात केली. यावेळी काही पोलिसांना हा ट्रकचालक म्हणजे आमदार असल्याचं समजताच त्यांनी पळ काढला. या स्टिंग ऑपरेशनने १०० कोटींचे टार्गेट, महावसूली आघाडी अशा अनेक चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत.

असे आहे वसुलीचे रेट कार्ड

कन्नड घाटाच्या दुरुस्तीच्या काम सध्या सुरू असल्याने हा मार्ग अवजड वाहनांसाठी प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. अशाही परिस्थितीत पोलीस प्रती वाहन ५०० ते १००० रुपये घेऊन वाहनांना प्रवेश देतात. यामुळे अनेकदा घाटात वाहतूक कोंडी होऊन ५ ते १० तास वाहतूक ठप्प होते. यामुळे गंभीर रुग्ण घेऊन जाणाऱ्या अॅम्ब्युलन्सही अडकून पडतात.

First Published on: November 25, 2021 11:33 PM
Exit mobile version