रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलन करणाऱ्या आमदाराचे वजन घटले

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आंदोलन करणाऱ्या आमदाराचे वजन घटले

अहमनगर : राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीसाठी आंदोलन करणारे पारनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांचे दोन किलो वजन कमी झाले आहे. गुरूवारी त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस होता. आमदार लंके व त्यांच्यासोबत आंदोलन करणाऱ्यांची डाॅक्टरांनी तपासणी केली.

अहमदनगर-पाथर्डी, अहमदनगर ते कोपरगाव आणि अहमदनगर ते करमाळा-टेंभुर्णी या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी आमदार लंके यांनी आंदोलन सुरू केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांचे उपोषण सुरु आहे. आंदोलनाचा तिसरा दिवस असल्याने डाॅक्टरांनी आमदार लंके व अन्य उपोषणकर्त्यांची तपासणी केली. आमदार लंके यांचे दोन किलो वजन कमी झाले आहे. मात्र चिंता करण्यासारखे काही नाही, असे डाॅक्टरांनी स्पष्ट केले.

आमदार लंके यांच्या मागणीला स्थानिकांनी पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी रास्ता रोकोही केला. त्यामुळे नगर तालुक्यातील करंजी, टाकळी ढोकेश्वर, पारनेर चिचोंडी पाटील व आरणगाव येथील मार्ग प्रभावीत झाला होता. तीन दिवस उलटून गेले तरी प्रशासनाने आमदार लंके यांच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. आमदार लंके यांची मागणी मान्य न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन तीव्र करेल, असा इशाराही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. मात्र जर लोकप्रतिनिधीच्या आंदोलनाची दखल घेतली जात नसेल तर सर्वसामान्यांना न्याय कसा मिळेल, असा सवाल आमदार लंके यांनी उपस्थित केला आहे.

आमदार निलेश लंके यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली. आमदार लंके यांना “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्यालाटेमध्ये महाराष्ट्राची अवस्था दयनीय झाली होती. आमदार निलेश लंके यांनी भावळणी येथे सुमारे अकराशे बेडचे कोरोना केअर सेंडर उभं केले होते. या सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना सोयी सुविधा मिळत आहे की नाही यावर आमदार लंके स्वत: लक्ष ठेवून होते. परिणामी त्यांच्या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक झाले. त्यामुळे त्यांनी केलेल्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेणे अपेक्षित होते, असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

First Published on: December 9, 2022 6:46 PM
Exit mobile version