गोव्याच्या मत्स्यबंदीवर आमदार नितेश राणे पुन्हा आक्रमक

गोव्याच्या मत्स्यबंदीवर आमदार नितेश राणे पुन्हा आक्रमक

जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांना वेठीस धरण्याचे काम गोवा राज्य सरकारकडून सातत्याने होत आहे. गोव्याची ही अरेरावी अशीच चालू राहिल्यास गोवा पासिंगची एकही गाडी जिल्ह्यातून जाऊ देणार नाही, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. शुक्रवार, २ नोव्हेंबर रोजी कणकवली येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्ह्यातील मासे वाहतूक करणार्‍या वाहतुकदारांच्या प्रश्‍नावर राणे यांनी आपली भूमिका जाहीर केली. एवढ्याश्या गोव्यापुढे बलाढ्य सरकार झुकतंय ही सर्वात मोठी शोकांतिका असल्याचे राणे यांनी सांगून पालकमंत्री, आमदार वैभव नाईक यांच्यावर त्यांनी टीका केली.

काय म्हणाले नितेश राणे

जिल्हाच्या किनारपट्टीवर कुठल्या न कुठल्या मार्गाने संकटं येत आहेत. मच्छिमार बांधवांच्या गेल्या साडेचार वर्षांपासून मी वेगळ्या माध्यमातून पाठीशी राहिलो आहे. आपल्या जिल्ह्याचे अर्थकारण हे मासेमारीवर अवलंबून आहे. त्यामुळे गोवा सरकारकडून राजकारण केले जात आहे. आम्ही त्यांच्यावर अवलंबून असल्याने अर्थकारण करू शकत नाही, असे त्यांना वारंवार वाटते. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. मासे विक्रेत्यांना गोवा सरकारकडून वेठीस धरले जात आहे. तरीही ना सरकारला जाग आलेली आहे किंवा पालकमंत्री असताना त्यांनाही याची जाणीव राहिलेली नाही, असे राणे म्हणाले.

आमचीही आरपारच्या लढाईची तयारी

त्याशिवाय राणे म्हणाले की, आरोग्याच्या बाबतीतही उपचार घेण्यासाठी जे रूग्ण गोवा बांबूळी येथे जातात. त्यांनाही दुय्यम वागणूक मिळते. त्यांच्या पाठीमागे उभे राहवे लागते. असा अन्याय सुरू आहे. आता मच्छीमारांवर निर्बंध आणून पुन्हा त्रास दिला जात आहे. त्यामुळे आम्हाला आता आरपारची लढाई करावी लागेल. तशी आमची तयारी आहे. मासेमारी विक्रीचा हा प्रश्न सोडवला नाही तर गोव्याच्या गाड्या परत तिकडे जाणार नाहीत, असा इशारा आ. राणे यांनी दिला असून ज्यांना समजायचे ते समजतील असे सुचक वक्तव्यही त्यांनी केले आहे.

खाजगी तत्त्वावर मासे मार्केट उभारणार

दरम्यान, जिल्हातील मासेविक्रेत्यांची सोय व्हावी म्हणून खाजगीतत्वावर बांदा येथे मासे मार्केट उभारणार आहोत. त्यासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. खाजगी तत्त्वावर मासे मार्केट उभारण्याची तयारी झाली आहे. आम्ही आमच्या माध्यमातून सत्ताधारी राज्यकर्त्यांसारख्या बैठका न घेता कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पाऊल पुढे टाकत आहोत असेही नितेश राणे यांनी नमूद केले.

First Published on: November 2, 2018 9:45 PM
Exit mobile version