आमदार रवी राणांची सुटका, तुरुंगातून बाहेर येताच मुख्यमंत्र्यांना दिला इशारा

आमदार रवी राणांची सुटका, तुरुंगातून बाहेर येताच मुख्यमंत्र्यांना दिला इशारा

बडनेराचे आमदार रवी राणा यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी रास्तारोको केल्यानंतर शुक्रवारी अमरावती पोलिसांनी अटक केली होती. अखेर रविवारी रवी राणा यांची तुरुंगातून सुटका झाली आहे. अमरावती जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तुरुंगातून बाहेर येताच रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.

रवी राणा यांची जिल्हा न्यायालयाने तुरुंगातून सुटका केली आहे. तुरुंगातून बाहेर येताच आमदार रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. हजारो शेतकऱ्यांसह सोमवारी ‘मातोश्री’वर आंदोलन करु असा इशारा दिला आहे. शिवाय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील राज्य सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबत आहे, असा आरोप केला आहे.

रवी राणा यांनी तीन दिवसांपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी मोझरी येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. रवी राणा यांच्यासह आंदोलन करणाऱ्या २० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, आज अमरावती जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार या सर्वांना जामीन देण्यात आला आहे.

फडणवीसांकडून राज्य सरकारचा निषेध

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निषेध व्यक्त केला. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा निषेध, असे ट्वीट फडणवीस यांनी केले होते. “शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी सुद्धा जेलभरो आंदोलन केले. आमदार रवी राणा हे तर आजही दिवाळीच्या दिवशी कारागृहात आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो,” अशा शब्दात रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या कारवाईचा देवेंद्र फडणवीस यांनी निषेध नोंदवला होता.


हेही वाचा – नितीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री; उद्या होणार शपथविधी सोहळा


 

First Published on: November 15, 2020 4:43 PM
Exit mobile version