तुम्ही जिम सुरू करा, मी बघतो काय ते!

तुम्ही जिम सुरू करा, मी बघतो काय ते!

केंद्र सरकारने जिम सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी अद्याप महाराष्ट्र सरकारने जिम सुरू करण्यास मान्यता दिलेली नाही. त्यामुळे जिम व्यवसायाशी संबंधित असलेल्या अनेकांचा गंभीर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिम चालक आणि मालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी, राज्य सरकारला काही वेगळी अक्कल आहे का? अशा शब्दात राज ठाकरेंनी त्यांच्यावर जोरदार टीका केली असताना तुम्ही जिम सुरू करा, मी बघतो काय ते, असा दिलासा राज ठाकरे यांनी जिम मालकांना दिला आहे.

केंद्र सरकार सांगतंय की जिम सुरू करा. विमानतळंदेखील सुरू करायला सांगितली आहेत; पण राज्य सरकार म्हणतंय की आम्ही असं करणार नाही. मग राज्याला काही वेगळी अक्कल आहे का? असा सवाल करत राज ठाकरे यांनी राज्य सरकारच्या कार्यशैलीवर निशाणा साधला. तुम्ही जिम सुरू करा, किती दिवस लॉकडाऊनमध्ये काढणार आहात. मी स्वत: टेनिस खेळायला सुरुवात केली आहे. गोल्फ, टेनिस इतकें फिजिकल डिस्टन्सिंग कुठल्याच खेळात नाही; पण ते सुद्धा बंदच आहे, या मुद्याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

बाजार सुरु आहेत. सगळीकडे सगळ्या गोष्टी सुरु आहेत. मूर्खाचा बाजार सुरू आहे. केंद्र सरकार सांगत आहे काही गोष्टी सुरु करा, राज्य सुरु करायला तयार नाही. मागे केंद्राने विमानतळ सुरू करायला सांगितले; पण राज्य तयार नव्हते. अशा वेळी असे वाटते की राज्याला वेगळी अक्कल आहे का? प्रत्येक जण आपली काळजी घ्या, प्रत्येकाची काळजी घ्या. केंद्राने गाईडलाईन्स दिल्या आहेत, त्या पाळून काळजी घ्या, असा सल्ला त्यांनी जिम चालक आणि मालक यांना दिला.

First Published on: August 12, 2020 6:51 AM
Exit mobile version