स्वच्छतागृह निर्मितीच्या कामाला गती; मनसेने केला होता पर्दाफाश

स्वच्छतागृह निर्मितीच्या कामाला गती; मनसेने केला होता पर्दाफाश

शहरातील महत्वाच्या ठिकाणी स्वच्छतागृहांच्या निर्मितीसाठी खासगी सहभागातून वातानुकूलित डिलक्स स्वच्छतागृह उभारून त्या बदल्यात त्यावरील जाहिरातींचे हक्क देण्याच्या महापालिकेची योजना होती. मात्र स्वच्छतागृहांची कामे पूर्ण करण्याआधीच त्यावरील जाहिराती सुरू करून जाहिरातीच्या निधीवर डल्ला मारणाऱ्या ठेकेदारांचा हा प्रकार मनसे प्रभाग अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून उघडकीस आणला होता. त्यानंतर पाठपुरावा केल्याने दोन आठवड्यात या अपूर्ण स्वच्छतागृहाच्या कामाला वेग आला.

स्वच्छ भारत योजनेअंतर्गत शहरात २० ते २५ ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्यात येणार होते. मात्र स्वच्छतागृह सुरू होण्याआधीच ठाणे महापालिका ठेकेदारावर मेहेरबान होत जाहिरबाजी सुरू झाल्याचे उघडकीस आले. प्रत्यक्षात स्वच्छतागृह सुरू झाल्याशिवाय त्या ठिकाणी जाहिराती करण्यास मनाई असतानाही अशा ठिकाणी जाहिराती केल्या जात आहे. अशा जाहिराती करून उत्पन्न कमाविण्याऱ्या ठेकेदारांचा हा प्रकार मनससेने उघडकीस आणल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अपूर्ण असलेल्या स्वच्छतागृहाच्या कामास वेग आला आहे.

स्वच्छतागृहाचे बांधकाम सुरू होण्यापूर्वी शहरातील २० ते २५ ठिकाणी उभारण्यात आलेल्या जाहिरातींच्या पैशांतून मिळविलेले लाखो रूपये कोणाच्या खिशात गेले? पालिका अधिकाऱ्यांचे आणि ठेकेदारांचे अर्थपूर्ण संबंध होते का? याबाबतची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.

– स्वप्निल महिंद्रकर ( मनसे प्रभाग समिती अध्यक्ष)

ठेकेदाराचे पितळ उघडे पडल्यानंतर प्रशासनाकडून दखल

या स्वच्छतागृहाच्या रंगरंगोटी, दुरूस्तीचे काम केले जात असून शहरात महत्वाच्या ठिकाणी आवश्यक असलेल्या स्वच्छतागृहाची सुविधा आता ठाणेकरांना लवकरच अनुभवण्यास मिळणार आहे. जाहिरात ठेकेदाराचे पितळ उघडे पडल्यानंतर महापालिका प्रशासनाने याबाबत दखल घेत ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. मात्र तरी अद्यापही गेल्या चार महिन्यांपासून ठेकेदारांनी काम पूर्ण होण्याआधी जाहिरतींमधून मिळविलेल्या उत्पन्नाबाबत कोणतीच भूमिका प्रशासनाने न घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


हेही वाचा – उद्धव ठाकरेंच्या ऑफिसमध्ये आयएएस अधिकाऱ्यांना मिळणार स्थान!

First Published on: December 4, 2019 6:08 PM
Exit mobile version