राज ठाकरे दिवाळीनंतर करणार अयोध्या दौरा

राज ठाकरे दिवाळीनंतर करणार अयोध्या दौरा

गुरू माँ कांचन गिरी, जगद्गुरू सूर्याचार्य यांनी आज मुंबईत दाखल होत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी त्यांनी ही भेट घेतली. दरम्यान हिंदू राष्ट्र बांधणीसाठी ही भेट असल्याचे बोलले जात आहे. यातच दिवाळीनंतर राज ठाकरे अयोध्येला जाणार आहेत अशी माहिती समोर येत आहे. गुरू माँ कांचन गिरी यांच्या भेटीदरम्यान राज ठाकरेंच्य़ा अयोध्या दौऱ्यावरही चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान गुरू माँ कांचन गिरी यांनी मी राज ठाकरेंना अयोध्येत येण्याचं निमंत्रण देणार असल्याचे यापूर्वीचं स्पष्ट केले होते. तसेच साधू-संत-महंतांच्या हजेरीत त्यांचे भव्य स्वागत करणार असल्य़ाचेही सांगितले होते. त्यामुळे भाजपा-मनसेच्या युतीच्या चर्चांदरम्यान राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला आता अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

गुरू माँ कांचन गिरी, जगद्गुरू सूर्याचार्य आणि त्यांचे सहकारी जगभरात हिंदू धर्माच्या प्रसार आणि प्रचार करत असतात. यापूर्वी देखील माँ कांचन गिरी दिवंगत शिवेसना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्यासाठी महाराष्ट्रात आल्या होत्या.

दरम्यान आज राज ठाकरेंच्या भेटीआधी गुरू माँ कांचन गिरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मी बाळासाहेबांना भेटले होते. सेनाप्रमुखांच्या भेटीवेळी खूप प्रभावित झाले होते. राज ठाकरेंमध्ये बाळासाहेब ठाकरेंची छबी दिसते. ते जे बोलतात ते करुन दाखवतात. राज ठाकरेंच्या हिंदुत्वाबद्दलही मी ऐकलं आहे. राज ठाकरे मनानं कट्टर हिंदू आहेत. राज ठाकरे हिंदुत्वासाठी सिंहगर्जनेसारखे बोलतात. हिंदूंचा आवाज बुलंद करायचाय आहे. त्यांनी परप्रांतीय मतभेद दूर करण्याचा प्रयत्न करावा कारण अनेक उत्तर भारतीय तरुणांना आगामी काळात भेट घालून देणार असल्याचे त्यांनी यापूर्वी सांगितले आहे.


 

First Published on: October 18, 2021 12:35 PM
Exit mobile version