राज ठाकरेंना विधानसभेसाठी मोठी संधी – प्रकाश आंबेडकर

राज ठाकरेंना विधानसभेसाठी मोठी संधी – प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विधानसभेत मोठी संधी असल्याचं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. आज, मंगळवारी प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केले. यावेळी विधानसभेत युतीमुळे शिवसेनेची पोकळी राज ठाकरे यांना किंगमेकर बनवू शकणार असल्याचा दावा आंबेडकर यांनी केला. दरम्यान, राज ठाकरेंच्या मनसेसोबत कोणत्याही संभाव्य आघाडीची शक्यता मात्र त्यांनी फेटाळली आहे.

प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

राज्यातील राष्ट्रवादीचे दहा आमदार आपल्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच राज्यातील संपूर्ण काँग्रेस पक्षच आपल्या संपर्कात असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडी होईल की नाही याबाबत अद्याप काहीच सांगू शकत नसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले. यावेळी लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशाबाबत बोलताना, राज्यात औरंगाबाद वगळता इतर ठिकाणी मुस्लीम मतदार सोबत न आल्याने लोकसभेत पराभव झाल्याचे त्यांनी नमूद केले.

हा निर्णय राजू शेट्टींनी घ्यावा

वंचितमुळे पराभव झाल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले होते. त्यावर प्रश्न विचारला असता, लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची बोलणी सुरू होती. त्यावेळी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी वंचित बहुजन आघाडीसोबत येण्याचे आमंत्रण आम्ही त्यांना दिले होते. परंतू त्यांनी काँग्रेस आघाडीला प्रधान्य दिले. त्यामुळे हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी वंचितसोबत आले, तर त्यांचे स्वागतच आहे, असे म्हटले होते. आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीसोबत यायचे की नाही हा निर्णय राजू शेट्टी यांनीच घ्यावा, असेही आंबेडकर यावेळी म्हणाले.

First Published on: June 4, 2019 2:50 PM
Exit mobile version