सरकारचा अनलॉकचा एक्झिट प्लॅन आहे का? मनसेचा सवाल

सरकारचा अनलॉकचा एक्झिट प्लॅन आहे का? मनसेचा सवाल

राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुवारी मंत्रीमंडळ बैठकीनंतर दिले. लॉकडाऊन वाढवण्याची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करतील असे त्यांनी स्पष्ट केलं आहे. यावरुन आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सरकारला सवाल केला आहे. नेमकी किती रुग्णसंख्या झाली की सरकार निर्बंध शिथिल करणार आहे? तसंच सरकारचा अनलॉकचा एक्झिट प्लॅन आहे का? असा सवाल करत संदीप देशपांडे यांनी केला आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला आहे. “सरकारचा अनलॉकचा एक्झिट प्लॅन आहे का? नेमकी किती रुग्ण संख्या झाली की सरकार निर्बंध शिथिल करणार आहे? मंत्रिमंडळात लॉकडाऊनवर चर्चा होते तशी बेरोजगारी, बुडालेले उद्योगधंदे, वीजबिल, जनतेचे आर्थिक नुकसान, बँकांचे हप्ते यावर चर्चा होत असेल का? यावर ठोस उत्तर सरकार देईल का?” असं ट्विट करत सरकारला प्रश्न केले आहेत.

लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याची सर्वच मंत्र्यांची मागणी

राज्यात लॉकडाऊनचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. त्यामुळेच राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवलं जावं अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवण्याची मागणी सर्वच मंत्र्यांनी केली आहे. मात्र लॉकडाऊन बाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाहीर करतील, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ते बोलत होते.

 

First Published on: May 13, 2021 9:51 AM
Exit mobile version