आता मनसेही तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार

आता मनसेही तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार

आता मनसेही तिथीनुसार शिवजयंती साजरी करणार

काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेवर नाराज झालेल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी मनसेने आपल्या पक्षाचा झेंडा बदलत हिंदुत्वाची कास धरली. आता तर शिवसेनेच्या आणखी एका कृतीचे अनुकरण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पक्ष करणार आहे. शिवसेनेप्रमाणे आता मनसे देखील शिवजयंती तिथीनुसार साजरी करणार आहे. कृष्णकुंज येथे शनिवारी झालेल्या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना तसे आदेश दिले. विशेष म्हणजे मनसे येत्या १२ मार्च रोजी शिवजयंती तिथीनुसार साजरी करणार असून, ही शिवजयंती औंरगाबाद येथे साजरी करण्यात येणार आहे. या शिवजंयतीच्या कार्यक्रमाला खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत.

म्हणून औरंगाबादमध्ये शिवजंयती –

औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असून, या महानगरपालिकेत शिवसेनेला टक्कर देण्यासाठी मनसे आतापासूनच तयारीला लागली आहे. त्यामुळे औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक लक्षात घेता तिथीनुसार शिवजयंती औरंगाबादमध्ये साजरी करण्याचा निर्णय मनसेने घेतला आहे. विशेष बाब म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने काही बदल केले असून, शिवसेनेतून मनसेमध्ये प्रवेश केलेल्या हर्षवर्धन जाधव आणि सुहास दशरथे यांच्याकडे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. हर्षवर्धन जाधव यांच्याकडे कन्नड आणि सिल्लोड विधानसभा क्षेत्राचे जिल्हाध्यक्ष पद तर सुहास दशरथे यांच्यावर औरंगाबाद शहरातील विधानसभेच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. दरम्यान सुमित खांबेकर यांना मात्र जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे.

मुंबईची टीम औरंगाबाद, नवी मुंबईत जाणार –

सगळ्यात महत्वाची बाब मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या दोन्ही महानगरपालिका निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केले असून, मनसेचे मुंबईतील पदाधिकारी आणि नेत्यांची फौज औरंगाबाद आणि नवी मुंबई येथे जाणार आहेत. तसे आदेशच राज ठाकरे यांनी दिले आहेत.

पक्षाने जी नवीन जबाबदारी दिली आहे ती मी योग्य प्रकारे पार पाडणार असून, पक्ष वाढीसाठी योग्य काम करणार आहे. तसेच औरंगाबाद निवडणुकीत मनसेला जास्त यश कसं मिळेल हे बघणार आहे.

हर्षवर्धन जाधव, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ,मनसे

 

औरंगाबादमध्ये काही बदल करण्यात आले असून, औरंगाबादचे मावळते जिल्हाध्यक्ष सुमित यांना राज्य स्तरावरची जबाबदारी दिली जाणार आहे. तसेच संभाजी नगरमध्ये शिवजयंती साजरी होणार असून, राजसाहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत.

अभिजित पानसे, मनसे नेते

First Published on: February 29, 2020 4:35 PM
Exit mobile version