Cruise Drug Case: क्रूझ ड्रग्ज प्रकरणात कोणते मंत्री, आमदार होते त्याचे पुरावे देतो, पुन्हा चौकशी करा – मोहित कंबोज

Cruise Drug Case: क्रूझ ड्रग्ज प्रकरणात कोणते मंत्री, आमदार होते त्याचे पुरावे देतो, पुन्हा चौकशी करा – मोहित कंबोज

मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त संजय पांडे क्रूझ ड्रग्ज प्रकरणाचा पुन्हा नव्याने तपास करणार असल्याचं वृत्त आहे. यावर भाजप नेते मोहित कंबोज यांनी प्रतिक्रिया देताना क्रूझ ड्रग्ज प्रकरणात कोणते मंत्री, आमदार होते त्याचे पुरावे देतो, पुन्हा चौकशी करा, असं आवाहन त्यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना केलं आहे. याशिवाय त्यांनी परेलमध्ये झालेला व्यवहार हा कोणी कोणासाठी केला याचाही तपास व्हावा, अशी देखील मागणी केली आहे.

मोहित कंबोज यांनी व्हिडिओ ट्विट करत क्रूझ ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. “एनसीबीचे अधिकारी ज्यांचा क्रूझ केसशी संबंध होता आणि त्यात काय भ्रष्टाचार झाला. त्यावर जी एसआयटी बनली होती, त्याचा पुन्हा एकदा तपास करणार असल्याची माहिती आहे. त्याचं मी स्वागत करतो. सुनील पाटील, प्रभाकर साईल, किरण गोसावी, नवाब मलिक ते शिवसेनेचा एक मंत्री, याच बरोबर काँग्रेसचे असे कोणते आमदार, मंत्री यात होते, याचा तपास करावा. परेलमध्ये झालेला व्यवहार हा कोणी कोणासाठी केला? कोण दलाल होता? याचाही तपास व्हावा. या प्रकरणात तपास करुन गुन्हा दाखल करा,” अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली.

परेलच्या घटनेत कुणी कोऑर्डिनेट केलं. त्यात कोण दलाल होते. कोणते लोक होते, कोण चर्चेत होते? पण हे सर्व प्रकरण नंतर दाबण्यात आलं. काही लोकांची साक्ष का नोंदवली गेली नाही. न्यायालयात दिलेलं प्रतिज्ञापत्र आणि जे सत्य आहे त्यात काही अंतर आहे का? या सर्व गोष्टी समोौर आल्या पाहिजेत. दूध का दूध पानी का पानी झालं पाहिजे, असं मोहित कंबोज म्हणाले.

मी सर्व पुरावे द्यायला तयार

या प्रकरणात मला चौकशीसाठी बोलवा माझ्याकडे या संदर्भात पुरावे आहेत. यात सहभाग असलेली लोकं अजूनही अधिवेशनात बसली आहेत. त्यांची यात काय भूमिका आहे, हे संपूर्ण जगापुढे यायला हवं. मी सर्व पुरावे द्यायला तयार आहे, असा खळबळजनक दावा मोहित कंबोज यांनी केला आहे.

 

First Published on: March 5, 2022 1:37 PM
Exit mobile version