मोहसीन शेख हत्या प्रकरण हिंदू राष्ट्र सेनेच्या २० जणांची निर्दोष मुक्तता

मोहसीन शेख हत्या प्रकरण हिंदू राष्ट्र सेनेच्या २० जणांची निर्दोष मुक्तता

मोहसीन शेख या तरुणाची हत्या केल्याच्या आरोपातून हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई यांच्यासह संघटनेच्या २० जणांची स्थानिक न्यायालयाने शुक्रवारी निर्दोष सुटका केली.

पुण्यातील हडपसर येथे २ जून २०१४ रोजी मोहसीन शेख याची जमावाने हत्या केली होती. सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आल्यामुळे हडपसर परिसरात तणाव होता. त्याचवेळी मोहसीन शेख आणि त्याचा भाऊ आपल्या मित्रांसह हडपसर येथील एका मशिदीत जात असताना हिंदू राष्ट्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी शेखला बॅटने मारहाण झाली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. हिंदू राष्ट्र सेना प्रमुख धनंजय देसाईने केलेल्या चिथावणीखोर भाषणामुळे आक्रमक होत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेखची हत्या केल्याचा त्यांच्यावर आरोप होता.

शेख हा मूळचा सोलापूरचा रहिवासी होता. तो पुण्यात आयटी कंपनीत काम करीत होता. या हत्येमुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास केला. ही हत्या हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे पोलीस तपासात पुढे आल्याने देसाईलाही अटक झाली. देसाईसह संघटनेच्या २० कार्यकर्त्यांवर शेखच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणात ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली, मात्र काही दिवसांनी उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणातून माघार घेतली, मात्र खटला सुरू राहिला. आरोपींवर आरोप निश्चिती झाली. त्यांनी आरोप फेटाळल्यानंतर सरकारी पक्षाने त्यांच्या विरोधात सबळ पुरावे सादर केले, मात्र न्यायालयाने शुक्रवारी निकाल देत देसाईसह सर्व आरोपींची शेखच्या हत्येतून सुटका केली.

First Published on: January 27, 2023 3:30 AM
Exit mobile version