महाराष्ट्रात मॉन्सूनचा मुक्काम आठवड्याभराने रखडला

महाराष्ट्रात मॉन्सूनचा मुक्काम आठवड्याभराने रखडला

ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात मॉन्सूनचा महाराष्ट्रातील परतीचा प्रवास सुरू होईल असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने जाहीर केले होते. पण मॉन्सूनचा मुक्काम मात्र आणखी आठवड्याभराने वाढणार आहे असे हवामान केंद्राच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे येत्या १० ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान मॉन्सूनची शक्यता हवामान केंद्राने स्पष्ट केली आहे.
सक्रीय हवामानाच्या परिस्थिती मुळे मान्सूनचा परतीचा प्रवास 6 ऑक्टोबर पासून पुढे सरकला नाही, म्हणूनच राज्यात मॉन्सूनचा मुक्काम कायम असणार आहे.

राज्यात मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र याठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाला मिळालेल्या रडार इमेजच्या आधारावरच ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. राज्यात औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी या भागातही पावसाने हजेरी लावली आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये राज्यातील काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे.

याआधी महाराष्ट्रातील मॉन्सून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून परतण्याची सुरूवात होईल असे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईमार्फत स्पष्ट करण्यात आले होते. यंदाचा मॉन्सून हा सर्वात विशेष ठरला आहे, कारण सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद यंदाच्या हंगामात झालेली पहायला मिळाली आहे. तसेच मॉन्सूनचा यंदाचा मुक्काम हा सरासरी वेळेपेक्षेही अधिकच होता. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून म्हणजे ९ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत मॉन्सून आपला परतीचा प्रवास सुरू करेल अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने जाहीर केली होती.


 

First Published on: October 9, 2020 7:43 PM
Exit mobile version