ORANGE ALERT : पाऊस जोरदार ‘कमबॅक’ करणार

ORANGE ALERT : पाऊस जोरदार ‘कमबॅक’ करणार

गेल्या काही दिवसांमध्ये थांबून थांबून पडणारा पाऊस पुन्हा एकदा जोरदार पद्धतीने सक्रिय होण्याचे संकेत आहेत. पुढच्या दोन दिवसांमध्ये मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रात घाट भागात, कोकणात, गोव्यातही मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

 मुंबई तसेच मुंबई नजीकच्या परिसरात येत्या २४ तासांमध्ये अति मुसळधार पावसाचे संकेत हवामान विभागामार्फत देण्यात आले आहेत. हवामान विभागाने रडार तसेच सॅटेलाईट इमेजच्या आधारावर स्पष्ट केले आहे की मोठ्या प्रमाणात पश्चिम किनारपट्टीवर ढगांची गर्दी पहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या २४ तासांमध्ये मुंबईसह परिसरात अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये मध्यम स्वरूपाचा असा पाऊस झाला. तर पुढच्या ४८ तासांमध्ये पावसाचा जोर वाढेल असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

 संपुर्ण महाराष्ट्रासाठी यलो तसेच ऑरेंज एलर्ट हवामान विभागामार्फत जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणासाठी हा एलर्ट देण्यात आला आहे. कोकणात सिंधुदुर्ग येथे आज अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागामार्फत देण्यात आला आहे. कोकणाचाच भाग असलेल्या मुंबईसह ठाणे पालघर, रायगड आणि रत्नागिरी भागातही मोठ्या पावसाची शक्यता ही येत्या २४ तासांमध्ये हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आली आहे. ठाणे, पालघर, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील काही जिल्ह्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल. तर गुरूवारी मात्र कोकण परिसरात काही ठिकाणी पाऊस पडेल. त्यानंतर मात्र पावसाचा जोर कमी होईल अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईच्या वैज्ञानिक शुभांगी भुते यांनी दिली. 

First Published on: July 14, 2020 1:49 PM
Exit mobile version