काय करू? माझ्यातला ‘तो’ गुण जातच नाही! – एकनाथ खडसे

काय करू? माझ्यातला ‘तो’ गुण जातच नाही! – एकनाथ खडसे

एकनाथ खडसे

‘गेली अनेक वर्ष विरोधी बाकावर राहून काम करत आहे. विरोधी पक्षनेता हा आपला पक्ष सत्तेत कसा येईल? यासाठी प्रयत्न करत असतो. प्रसंगी सत्तेच्या नशेत चूर झालेल्या सत्ताधारांन्या वठणीवर आणण्याचे काम करतो. मी विरोधी पक्षनेता म्हणून खूप वर्ष काम केले, त्यामुळे आता सरकारमध्ये असलो तरी विरोधी पक्षात असल्या सारखेच वाटते. आमच्याच मंत्र्यांना मी अडचणीत आणणारे प्रश्न सभागृहात विचारतो. काय करू माझ्यातील विरोधी पक्षातला तो गुण जातच नाही’, अशी कबुलीच एकनाथ खडसे यांनी विधानसभेत दिली. नव्याने जाहीर झालेले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलत असताना एकनाथ खडसे यांनी चौफेर टोलेबाजी केली.

‘मुख्यमंत्री आणि माझं ठरलंय!’

अजित पवार यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी खडसे यांच्यावर अन्याय का केला? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना खडसे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री आणि माझं ठरलंय. आमच्यात काय झालं ते आम्हा दोघांच्यामध्येच आहे’. यावर गुलाबराव पाटील यांनी ‘तुमच्यात काय ठरलंय ते सभागृहाला सांगा, तो सभागृहाचा हक्क आहे’, असा टोमणा मारला. मात्र हजरजबाबी असलेल्या खडसेंनी गुलाबराव पाटलांचा हा वार पलटवताना म्हटले की, ‘आधी उद्धव ठाकरेंचं काय ठरलंय ते सांगा? जोपर्यंत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांचे गुपित बाहेर येत नाही, तोपर्यंत माझे आणि मुखमंत्र्यांचेही बाहेर येणार नाही’, अशी खुमासदार प्रतिक्रिया दिली.

उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी सर्व खासदारांसहीत कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिराला भेट दिली होती. ‘जागावाटपाबाबत मुख्यमंत्री आणि आमचं ठरलंय’, असं ते म्हणाले होते. त्याचाच आधार घेत खडसेंनी हा टोला लगावताच सभागृहात एकच हशा पिकला!


हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या आंघोळीसाठी आव्हाड बिल भरणार!

‘विरोधी पक्षनेते पदावरून थेट कॅबिनेट, याला भाग्य लागते’

विजय वडेट्टीवार यांचे अभिनंदन करत असताना खडसे यांनी विखे पाटील यांना चांगलेच कोंडीत पकडले. ‘विखे पाटील यांनी चार वर्षांत आपला ठसा उमटवला होता. पण त्यांनी अचानक राजीनामा दिला. खरंतर विखे पाटील यांच्यामुळेच वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेतेपद मिळाले. मराठीत एक म्हण आहे, “बाळा कशी होऊ मी उतराई, तुझ्यामुळे झाले मी आई”, या म्हणीप्रमाणे आता वडेट्टीवार यांना विखे पाटलांचे उतराई व्हावे लागेल’, असं खडसे म्हणाले.

‘पण विरोधी पक्षनेतेपदी काम करून थेट कॅबिनेटमध्ये तिसऱ्या स्थानी जागा मिळवण्यासाठी भाग्य लागते’, असा चिमटा खडसेंनी विखेंना काढला. ‘भाजपमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्री आहेत. मात्र सर्वांना डावलून थेट तिसऱ्या स्थानी येण्याची किमया विखे पाटील साधू शकले याबाबत त्यांचे अभिनंदनही केले. मला मात्र विखे पाटील यांच्यासारखी परंपरा चालवता येणार नाही’, अशी उपरोधिक टीकाही खडसे यांनी केली.

First Published on: June 24, 2019 4:58 PM
Exit mobile version