2 वर्षानंतर होणार माउंट मेरीची यात्रा; महापालिकेची जय्यत तयारी

मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मुंबईसह आसपासच्या परिसरात मोठ्या जल्लोषात सण व उत्सव साजरे केले जात आहेत. नुकताच मुंबईत दहीहंडी आणि गणेशोत्सव मोठ्या आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत बाप्पाच्या मिरवणुका काढण्यात आल्या. त्यानंतर आता इतर सणही उत्साहात साजरे केले जात आहेत. त्यानुसार आता वांद्रे येथील माऊंट मेरीची यात्रा होणार आहे. (mount mary fair 2022 will be held from September 11 to 18)

दोन वर्षानंतर आता 11 ते 18 सप्टेंबर दरम्यान माऊंट मेरीची यात्रा होणार आहे. या जत्रेला 100 वर्षांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा आहे. या जत्रेला वांद्रे महोत्सव म्हणूनही ओळखले जाते. आता 2 वर्षानंतर ही जत्रा होणार असल्याने दररोज एक लाखांपेक्षा अधिक भाविक भेट देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

या अनुषंगाने मुंबई महानगरपालिकेच्या ‘एच पश्चिम’ विभागाद्वारे विविध नागरी सेवा सुविधांबाबत सुयोग्य तयारी करण्यात आली असून भाविकांच्या सेवेसाठी महानगरपालिका सुसज्ज आहे. विशेष म्हणजे यंदा प्रथमच युट्युब, ट्विटर यासारख्या समाज माध्यमांद्वारे या यात्रेचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘एच पश्चिम’ विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी दिली.

“यंदा 11 ते 18 सप्टेंबर यादरम्‍यान माऊंट मेरीची होणार आहे. गेली दोन वर्षे म्हणजेच सन 2020 व 2021 मध्ये ‘कोविड-19’ च्या प्रादुर्भावामुळे या यात्रेचे आयोजन करण्यात आले नव्हते. मात्र, या साथ रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिकेने केलेल्या विविध उपायोजना आणि प्रभावीपणे राबविलेली लसीकरण मोहीम यामुळे यंदा कोविड संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात आहे.”, असेही विनायक विसपुते यांनी म्हटले.

या यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर महानगरपालिकेकडून यात्रा सुरळीतपणे पार पाडण्‍यासाठी सर्व उपाययोजना करण्‍यात येत आहेत. चर्च ऑथॉरिटीने दिलेल्‍या माहितीनुसार यावर्षी प्रतीदिन साधारण 1 लाख भाविक दर्शनासाठी व यात्रेसाठी येतील अशी अपेक्षा आहे. येणाऱ्या भाविकांच्‍या सोयीसाठी आणि स्‍थानिक परिसरातील गर्दी टाळण्‍यासाठी मुंबई वाहतुक पोलिसांच्‍या सहयोगाने वाहतुकीचे मार्ग निश्चित करण्‍यात आले आहेत.

माउंट मेरी यात्रेसाठी महानगरपालिकेची तयारी


हेही वाचा – राज्यात गणेश विसर्जनाला गालबोट, १९ जणांचा मृत्यू

First Published on: September 10, 2022 6:51 PM
Exit mobile version