कल्याणच्या पत्रीपुलासाठी नागरिकांचे भीक मागो आंदोलन

कल्याणच्या पत्रीपुलासाठी नागरिकांचे भीक मागो आंदोलन

कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडण्यासाठी महत्वाचा असणाऱ्या पत्रीपुलाचे काम अद्यापही संथगतीने सुरू असल्याने त्याविरोधात रविवारी दुपारी जागरूक नागरिकांनी ‘भिक मागो आंदोलन’ करत प्रशासनाचा निषेध केला. जुना पत्रीपुल बंद होऊन आता जवळपास १० महिने उलटले आहेत. मात्र नविन पुलाच्या कामाचे अद्याप सुरू झालेले नाही त्यामुळे वाहतूक कोंडीमुळे लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय.

नवीन पुलाचा दावा फोल

वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याचे सांगत ब्रिटीशकालीन पत्रीपुल गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात बंद करण्यात आला. त्यानंतर तब्बल ४ महिन्यांनी म्हणजे ३० डिसेंबर २०१८ ला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमूख उपस्थितीत नविन पुलाच्या कामाचे थाटामाटात भूमीपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात पुढील ८ महिन्यात नविन पूल बांधून तयार होईल असा दावाही करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात जानेवारीपासून ते मे पर्यंतच्या पाच महिन्यात अवघे ५ टक्के कामही होऊ शकलेले नाही.

ढिसाळ कामामुळे वाहतूक कोंडीचा फटका

पत्रीपुलाच्या ढिसाळ कामामुळे दररोज हजारो लोकांना वाहतूक कोंडीचा फटका बसतोय, दररोज हजारो रुपयांच्या इंधनाची नासाडी तर होतच आहे. पण त्याचसोबत वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, स्थानिक व्यापाऱ्यांचा व्यवसाय डबघाईला आला आहे. याचा निषेध नोंदवण्यासाठी स्थानिक जागरूक नागिरकांनी आज पत्रीपुल परिसरात भीक मागो आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान जमा झालेले पैसे आपण शासनाला पाठवणार असल्याची माहिती आंदोलनकर्ते शकील खान यांनी दिली.

पुलाचे काम लवकर व्हावे यासाठी स्थानिकांची मागणी

तसेच लवकरात लवकर या पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणीही स्थानिक नागरिकांनी यावेळी केली. पत्रिपुलाच्या कामासाठी अनेकवेळा आंदोलन झाली मात्र लोकप्रतिनिधी आणि सरकारी यंत्रणेला अजूनही जाग येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र चीड निर्माण झाली आहे.

First Published on: June 9, 2019 2:34 PM
Exit mobile version