निवडणूक लढविण्यासाठी लोकशाहीत सर्वांना स्वातंत्र्य, पोटनिवडणुकीवरून अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

निवडणूक लढविण्यासाठी लोकशाहीत सर्वांना स्वातंत्र्य, पोटनिवडणुकीवरून अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया

कसब्याची निवडणूक प्रतिष्ठेची बनली असतानाच चिंचवडमध्येही चुरस निर्माण झाली आहे. नाना काटे यांनी राष्ट्रवादी पक्षातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पण यामुळे नाराज झालेले राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. राहुल कलाटे यांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान, निवडणूक लढविण्यासाठी लोकशाहीत सर्वांना स्वातंत्र्य, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, या सगळ्या गोष्टी सुरू असताना मी दिल्लीत होतो. राहुल कलाटे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. निवडणूक लढविण्यासाठी लोकशाहीत सर्वांना स्वातंत्र्य आहे. अजित पवार आणि इतर नेत्यांनी निर्णय घेतल्यावर माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय बोलणार, असं अमोल कोल्हे म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर अमोल कोल्हे म्हणाले की, मला त्याविषयी काहीही माहीती नाही. मी संसदेत होतो. आमचे नेते राज्याच्या सर्वोच्च पदावर बसणे ही कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. त्यात काहीही गैर नाही, असं कोल्हे म्हणाले.

चिंचवडच्या जनतेचा मला पाठिंबा – राहुल कलाटे

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना राहुल कलाटे म्हणाले की, ‘चिंचवडच्या जनतेचा मला पाठिंबा आहे. येथील जनतेनेच ही निवडणूक लढवण्यासाठी माझ्या मागे रेटा लावला होता. यासाठी मला पाठिंबा देणाऱ्या मित्रांना, कार्यकर्त्यांना मी याठिकाणी बोलावून घेतले. नेत्यांसाठी आमचा अनादर करू नकोस, असं मला सांगण्यात आलं. जनतेचा आदर करणे हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे लोकभावना जपत आणि त्यांच्या जीवावर ही निवडणूक लढवणार,’ असे कलाटे म्हणाले.


हेही वाचा : बोहरा समाजानं वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केलं, जलसंवर्धनात मोठा वाटा – पंतप्रधान नरेंद्र मोदी


 

First Published on: February 10, 2023 7:55 PM
Exit mobile version