Sanjay Raut : आता कोणत्या पक्षात जाणार? कीर्तिकरांना राऊतांचा सवाल

Sanjay Raut : आता कोणत्या पक्षात जाणार? कीर्तिकरांना राऊतांचा सवाल

शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर (MP Gajanan Kirtikar) यांनी भारतीय जनता पक्षाच्या वागणुकीबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत घेत  गजानन कीर्तिकर यांच्यावर निशाणा साधला.

आता कोणत्या पक्षात जाणार?

गजानन कीर्तिकर हे शिंदे गटाचे सर्वात वयोवृद्ध आणि ज्येष्ठ नेते आहेत. कीर्तिकरांनी सांगितलं की, आम्हाला नीट वागणूक दिली जात नाही. आम्हाला सावत्रपणाची वागणूक मिळत आहे. आमची कामं होत नाहीत. अशा प्रकारचा पाढा त्यांनी भाजपला वाचून दाखवला. खरं म्हणजे शिवसेना सोडताना याच खासदार-आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसविषयी वाचून दाखवला होता. आता भाजपाबाबत वाचून दाखवत आहेत. तुम्ही आता कोणत्या नवीन पक्षात जाणार आहात. कारण तुम्हाला पक्षांतराची चटक लागलिये. तुम्हाला सावत्रपणाची वागणूक मिळतेय. तुम्हाला ती सहन करावी लागत आहे. तुमच्याकडे त्या ताकदीचं नेतृत्वही नाहीये की, भाजपासोबत संघर्ष करेल. तुम्ही काही नेते भाजपापुढे गुडघे टेकून राज्य करतायत, असं संजय राऊत म्हणाले.

पक्षाला मित्र म्हणून जवळ करायचं आणि गळा घोटायचा

सर्वपक्ष संपतील आणि भाजप राहील हे जे.पी.नड्डाचं काय अमित शाह देखील म्हणाले होते. भाजपाचं ते राष्ट्रीय धोरणच आहे. पक्षाला मित्र म्हणून जवळ करायचं आणि त्यांचा गळा घोटायचा. त्यामुळे भाजपची अवस्था अत्यंत पातळ झालेली आहे. त्यासाठी ते नवीन मित्रांच्या शोधासाठी आहेत, असं म्हणत राऊतांनी भाजपवर देखील निशाणा साधला.

सामनाच्या अग्रलेखातून कीर्तिकरांवर निशाणा

कीर्तिकरसारख्यांना जे हुंदके फुटले त्यावर मिंधे गटाच्या प्रवक्त्यांचे काय म्हणणे आहे? भाजपासंदर्भात असे हुंदके फुटल्याने कीर्तिकरांनी हिंदुत्वाशी प्रतारणा केली की, हे तुमचे ज्येष्ठ पुढारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कच्छपी लागले? हे लोकांना कळले तर बरे होईल. पुन्हा मिंधे गटातील 22 आमदार आणि नऊ खासदारांची भाजपाच्या सापत्न वागणुकीमुळे कोंडी होत आहे. ते सगळे मिंधे गटातून बाहेर पडण्याच्या मनःस्थितीत आहेत, अशीदेखील माहिती समोर आली आहे. मोठमोठ्या गमजा मारीत या मंडळींनी गद्दारी करीत भाजपाशी हातमिळवणी केली होती. मात्र वर्षाच्या आतच त्यांचा बहुधा प्रेमभंग झाला आहे आणि घटस्फोटाच्या गोष्टी होऊ लागल्या आहेत. खोक्यांनी स्वाभिमान आणि सन्मान विकत घेता येत नाही, हेच यातून पुन्हा सिद्ध झाले, असेही ठाकरे गटाने सुनावले आहे.


हेही वाचा : Shiv Sena UBT vs BJP : ज्याच्या खांद्यावर हात ठेवायचा त्याचा… ठाकरे गटाची भाजपावर


 

First Published on: May 30, 2023 1:43 PM
Exit mobile version