महावितरणच्या ग्राहकांना सुलभ हप्त्यांमध्ये वीजबिल भरण्याची सवलत

महावितरणच्या ग्राहकांना सुलभ हप्त्यांमध्ये वीजबिल भरण्याची सवलत

लॉकडाऊनच्या कालावधीत वीज ग्राहकांकडील मीटर रिडींग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीजबिल देण्यात आले. सध्या मीटर रिडींग घेऊन जून महिन्याचे वीजबिल देण्यात येत आहे. मात्र या वीजबिलांबाबत सोशल मिडीयावरून चुकीचे मॅसेज पाठवून ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्यात येत असून अशा अफवांवर ग्राहकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन महावितरणने केले. ग्राहकांना नियमित टप्प्यात वीजबिल भरण्याचा पर्यायही महावितरणमार्फत देण्यात आला आहे.

महावितरणच्या ग्राहकांवर कोणताही भुर्दंड लादण्यात आलेला नाही. ग्राहकांनी आपल्या वीज वापराची पडताळणी केली तर त्यांना आपले वीजबिल योग्य व अचूक असल्याचे लक्षात येईल. अनेक ग्राहकांनी स्वतःचे वीजबिल तपासून न बघता केवळ वीजबिलांची रक्कम जास्त दिसते म्हणून आलेले बिल चुकीचे आहे, असा समज करून घेत आहेत. मागील वर्षाच्या उन्हाळ्याचा वीजवापर आणि चालू वर्षातील लॉकडॉऊनमध्ये २४ तास घरात राहून केलेला वीजवापर यांची तुलना केली तर असे दिसून येईल की, यावर्षातील एप्रिल, मे व जून महिन्यातील वीजवापर हा मागील वर्षाच्या वीजवापराच्या तुलनेत बरोबर आहे.

महावितरण ही खाजगी कंपनी नसून सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय वीज कंपनी आहे. त्यामुळे वीजबिलात कुठलीही आकारणी छुप्प्या स्वरूपात करीत नाही किंवा आकारणी करताना मनमानी करीत नाही. वीज नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या दरानुसारच ग्राहकांना वीजबिल आकारले जाते. ग्राहकांच्या वीजबिलांवर सर्व माहिती छापील स्वरूपात दिलेली असून ग्राहकांनी वीजबिल संपूर्ण वाचले तर सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आलेला मॅसेज केवळ ग्राहकांची दिशाभूल करून ग्राहकांमध्ये रोष पसरविण्यासाठी तयार केलेला आहे असे स्पष्टपणे दिसून येत आहे.

वीजग्राहकांनी घरी बसूनच https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर जाऊन आपले बिल तपासून घ्यावे. काही चूक किंवा शंका आढळली तरच महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. लॉकडाऊन शिथिल झाला असला तरी करोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम आहेच. त्यामुळे महावितरणच्या कार्यालयातील गर्दी टाळावी आणि सुरक्षित रहावे व कोणत्याही अफवांवर किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

First Published on: June 24, 2020 6:54 PM
Exit mobile version