अत्यावश्यक सेवेतील शेकडो कर्मचाऱ्यांना एसटीने पाठविले सुट्टीवर, हे आहे कारण…

अत्यावश्यक सेवेतील शेकडो कर्मचाऱ्यांना एसटीने पाठविले सुट्टीवर, हे आहे कारण…

प्रातिनिधिक छायाचित्र 

लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.त्यामुळे प्रवासी महसूलात लक्षणीय घट आली असून भविष्यात एसटीचा गाडा हाकणे महामंडळाला जड होऊ शकते. त्यामुळे एसटी महामंडळाकडून खर्चाची बचत करण्यासाठी काटकसरीचा उपयोजन राबिवणे सुरु केले आहे. त्याअंतर्गत आता शेकडो एसटी कर्मचाऱ्यांना तब्बल २० दिवसांच्या रजेवर पाठविण्यास एसटी महामंडळाने सुरुवात केली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातवरण निर्माण झाले आहे.

एसटी महामंडळाचे उत्पन्न बंद  

देशासह महाराष्ट्र राज्यात २२ मार्चपासून लॉकडाऊन असल्याने, राज्य परिवहन महामंडळाची वाहतूक सेवा बंद आहे. वाहतूक सेवा बंद असल्यामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्न बंद झाले आहे. खर्चात काटकसर करण्याच्या दृष्टीने एसटी महामंडळ अनेक प्रयत्न सुरु केले आहे. वृद्ध प्रवासी आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एसटीला सर्वाधिक उत्पन्न मिळते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वृद्धांना प्रवासावर बंदी आणली आहे. आता शाळा आणि कॉलेज बंद असल्यामुळे एसटी बसेस रिकाम्या धावत आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाला मिळणारा प्रवासी महसूल स्रोत तुटला आहे.

वेतन कसे द्यायचे ?  

सध्या एसटी महामंडळात १ लाख ३ हजार कर्मचारी आहेत. गेले तीन महिने वेतन देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नव्हते. शासनाकडून येणाऱ्या सवलतीच्या पैशांतून एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांचे वेतन दिले आहे. एसटी  महामंडळाच्या सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी थकबाकीची रक्कम आता संपत जात आहे. पुढे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन कसे द्यायचे असा मोठा प्रश्न एसटी महामंडळाला भेडसावत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने काटकसर करण्याच्या दृष्टीने आता प्रयत्न सुरु केले आहेत.नुकतेच कोल्हापूर विभागातील शेकडो एसटी कर्मचाऱ्यांना २० दिवसाच्या रजेवर पाठविण्यात आले. प्रवासी नसल्याने आगारात कर्मचाऱ्यांना काम नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे बोलण्यात येत आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना वार्षिक ४० रजापैंकी महामंडळाने काही विभागातील कर्मचाऱ्यांना २० दिवसांच्या रजा देण्याचा निर्णय घेतला आहे. कारण या कोरोनाच्या काळात प्रवासी नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांना आगारात काम नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या रजा या मंदीकाळात खर्ची करून एसटी महामंडळ बचत करत आहे. या प्रभावी उपायांची सुरुवात एसटी महामंडळाच्या कोल्हापूर विभागातून सुरु झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे, कारण या रजा संपल्यास पुढे एसटी कर्मचाऱ्यांचा रजा पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे रजेचे वार्षिक नियोजन पूर्णतः कोलमडले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना वार्षिक ४० दिवसांची रजा महामंडळाकडून देण्यात येते. मात्र २०१४ च्या नियमानुसार प्रवासी मोसम नसताना यातील २० दिवसांची रजा एसटी कर्मचाऱ्यांना घ्यावी लागते. उर्वरित २० दिवसांची रजा त्यांच्या मर्जीनुसार घेता येते. आता कोरोनामुळे प्रवासी मोसम नसल्याने त्यांना नियमानुसार २० दिवसांची रजा देण्यात आली आहे.
संदीप  भोसले, विभागीय कर्मचारीवर्ग अधिकारी, कोल्हापूर विभाग
First Published on: July 6, 2020 8:00 PM
Exit mobile version