घृणास्पद! मुंबईत सात वर्षे परदेशी महिलेवर बलात्कार, उद्योगपतीविरोधात गुन्हा दाखल

घृणास्पद! मुंबईत सात वर्षे परदेशी महिलेवर बलात्कार, उद्योगपतीविरोधात गुन्हा दाखल

मुंबई – नोकरीनिमित्त पोलंडहून भारतात आलेल्या एका परदेशी महिलेवर मुंबईत बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. याप्रकरणी पीडित महिलेने अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून फरार आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

2016 मध्ये पोलंडहून एक महिला भारतात नोकरीसाठी आली. तिला Asian Business Exhibitions and Conferences Ltd (ABECL)चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिष गांधी यांनी नोकरीची ऑफर देऊ केली. सुरुवातीचे काही महिने खूप छान गेले. मात्र, मनिष गांधी पीडितेला त्रास देऊ लागला. तिच्या मोबाईलवर अश्लिल चित्रफित पाठवून तिच्याशी जवळीक साधू लागला. त्यानंतर, जर्मनीमध्ये एका प्रदर्शनासाठी दोघेही गेले होते. तेथे एका हॉटेलवर मनिषने पीडितेवर बलात्कार केला. या काळात त्याने तिचे अनेक अश्लिल फोटो आणि व्हिडीओ काढले होते. हे फोटो आणि व्हिडीओ दाखवून तो तिला धमकावत असे. २०१७ ते २०२२ दरम्यान सातत्याने आरोपीने पीडितेवर बलात्कार केला. या काळात तिने तिच्या मायदेशी परत जाण्याचाही निर्णय घेतला. परंतु, तिच्याकडील सर्व आवश्यक कागदपत्रे मनीष गांधी याने काढून घेतल्याने ती परत पोलंडला जाऊ शकत नव्हती. या सर्व प्रकारामुळे पीडिता अत्यंत तणावात गेली. अखेर तिने आपल्या वकिलांच्या मार्फत अंबोली पोलीस ठाण्यात मनीष गांधीविरोधात तक्रार दाखल केली. यासाठी तिने सर्व फोटो, व्हिडीओ आणि चॅट्सही पोलिसांना सादर केले.

पीडितेच्या वकिलांनी सांगितलं की, पीडिता गेल्या सात वर्षांपासून लैंगिक अत्याचार सहन करत आहे. तिचे खासगी छायाचित्र वापरून तिला धमकावलं गेलं. तिचा लैंगिक छळ केला गेला. त्यामुळे ती चिंता, पॅनिक अटॅक, झोपेच्या समस्या, भयानक आघात आणि नैराश्य आदी विविध मानसिक समस्यांतून जात आहे. या संपूर्ण कोलाहातून बाहेर पडण्याकरता तिला एक वर्षाचा कालावधी लागला. त्यानंतर तिने धीर एकवटून आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे तिने आता याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

अनेक कलमांखाली आरोपीवर गुन्हा दाखल

आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या (IPC) 376 (बलात्कार), 354 (विनयभंग) आणि 509 (गुन्हेगारी धमकी) यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “आम्ही एफआयआर नोंदवला आहे आणि पीडितेची वैद्यकीय तपासणी केली आहे. आमच्याकडे सर्व आवश्यक पुरावे आहेत,” असे या प्रकरणाचे तपास अंबोली पोसी ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल पाटील म्हणाले.

First Published on: March 12, 2023 9:31 AM
Exit mobile version