हिंगणघाट जळीत पीडितेसाठी मुंबईच्या डॉक्टरांची टीम रवाना

हिंगणघाट जळीत पीडितेसाठी मुंबईच्या डॉक्टरांची टीम रवाना

हिंगणघाट जळीतकांड - उद्धव ठाकरेंनी घेतली प्रकरणाची गंभीर दखल

वर्ध्यातील हिंगणघाट येथील जळीत तरुणीच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून केला जाणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंगणघाट येथे प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जाळण्याच्या करण्यात आलेल्या प्रयत्नाची गंभीर दखल घेतली असून दोषीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी व्यवस्थित तपास करावा अशा सूचना दिल्या आहेत. तसेच, या भाजलेल्या जखमी तरुणीवर योग्य ते उपचार करावेत, या उपचारांचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

या मुलीसाठी गृहमंत्री अनिल देशमुख डॉक्टरांच्या टीमसह नागपूरला रवाना झाले आहेत. बर्न्स स्पेशालिस्ट डॉ. सुनील केसवानी हे देखील त्यांच्यासमवेत नागपूरला पोहोचणार आहेत. महाराष्ट्राच्या लेकीसाठी मुंबईचे डॉक्टर्स नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करणार आहेत. या मुलीच्या उपचारांची पुढची दिशा ठरवण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख आणि डॉक्टरांची टीम नागपूरसाठी रवाना झाली आहे. तर, मुलीच्या उपचारांची सर्व जबाबदारी राज्य सरकार घेणार असल्याचं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. हिंगणघाटच्या जळीत कांडाचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाईल असंही अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

आंध्रप्रदेशाच्या कायद्याचा अभ्यास करणार –

ज्याने हे कृत्य केलं आहे त्याला कठोरातील कठोर कारवाई केली जाईल यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. नॅशनल बर्न सेंटरचे डॉ. सुनील केसवानी यांना घेऊन जाणार आहे. मी लवकरात आंध्रप्रदेशला जाणार आहे. आंध्रप्रदेशच्या कायद्याचा अभ्यास करुन त्याला लवकरात लवकर शिक्षा कशी मिळेल यासाठी जाणार आहे. पोलीस विभागाच्या वरिष्ठांसह जाऊन आंध्रप्रदेशच्या कायद्याचा अभ्यास केला जाईल. आणि २१ दिवसांच्या आत त्याला शिक्षा होईल का? महाराष्ट्रात आंध्रप्रदेशचा कायदा लागू करता येईल का? हे बघितलं जाणार आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असल्याचं ट्विट केलं आहे.

First Published on: February 4, 2020 6:38 PM
Exit mobile version