मुंबई-गोवा महामार्गावरील पावसाळी प्रवास नको रे बाप्पा!

मुंबई-गोवा महामार्गावरील पावसाळी प्रवास नको रे बाप्पा!

मुंबई-गोवा महामार्गावरील पावसाळी प्रवास नको रे बाप्पा!

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास काही अटींवर महाराष्ट्र शासनाने परवानगी दिली असल्यामुळे गणेशभक्त आनंदात असले तरी त्यांचा प्रवास मात्र, खडतर बनला आहे. त्यांच्या मार्गात खड्ड्यांचे विघ्न असून, ज्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून भक्तांचा प्रवास होतो त्या मार्गावर यावर्षीही अडखळत प्रवासाची ‘परंपरा’ अबाधित राहणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांमध्ये प्रचंड नाराजीची भावना आहे. आधीच कोरोनामुळे त्रस्त झालेले असताना त्यात खड्ड्यांच्या विघ्नाची मालिका वाढून ठेवल्यामुळे ‘या मार्गावरील प्रवास नको रे बाप्पा’ म्हणण्याची वेळ पुन्हा एकदा भक्तांवर आली आहे.

आधीच कोरोना त्यात खड्ड्यांमध्ये मरोना!

गेले १० वर्षे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. परंतु, हे काम कूर्मगतीने होत आहे. ते अद्याप पूर्ण झाले नाही. प्रत्येक वर्षी पावसाळ्यात या महामार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडतात. ते गणेशोत्साच्या वेळी बुजविण्याची औपचारिकता पार पाडून संबंधित स्वतःची पाठ थोपटून घेण्यात समाधान मानत आले आहेत. यंदा देखील महामार्गाची पेण ते इंदापूर दरम्यानच्या मार्गातील परिस्थिती दयनीय आहे. पेण ते वडखळ दरम्यान रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

वडखळ ते गडब, नागोठणे ते कोलाड, इंदापूर ते माणगाव, महाड ते पोलादपूर दरम्यानच्या मार्गाची परिस्थितीही बिकट झाली आहे. त्यामुळे चालकांना वाहन चालविताना दिव्य करावे लागत आहे. गणेशोत्सव अवघ्या ११ दिवसांवर येऊन ठेपला आहे. यासाठी कोकणात जाण्यास इच्छुक असलेल्या मुंबईकरांना राज्य सरकारने काही अटींवर परवानगी दिली आहे. या खड्ड्यांमुळे गणेशभक्तांचा प्रवास खडतर होणार आहे. सालाबादप्रमाणे यावर्षी देखील त्यांच्या मार्गात खड्ड्यांचे विघ्न कायम आहे. भर पावसात संथ गतीने सुरू असलेले खड्डे बुजविण्याचे काम केवळ औपचारिकता असल्याने काही तासातच खड्डे पुन्हा उखडून त्यातील खडी, माती, मोठे दगड बाहेर येऊन रोगापेक्षा इलाज भयंकर अशी परिस्थिती निर्माण होत आहे.

मुंबई-गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीसाठी सुरळीत करावा, असे निर्देश शासनाने दिले होते. मात्र, रस्त्यांची दुरुस्ती करण्यात महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार अपयशी ठरले. पेण ते वडखळ, वडखळ ते नागोठणे आणि कोलाड ते इंदापूरापर्यंत महामार्गावर खड्ड्यांचे ‘विशाल’ साम्राज्य आहे. अनेकदा टायर पंक्चर होणे, स्पेअर पार्टस्चे नुकसान, इंधनाचे गणित बिघडणे सुरू असल्याने वाहन चालक-मालक मेटाकुटीला आले असून, दुरुस्तीसाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवास ‘नको रे बाप्पा’ असे पुन्हा एकदा म्हणण्याची वेळी भक्तांवर आली आहे.

दरम्यान, या महामार्गाला कुणी वाली आहे का? असा सवाल सर्वांनाच पडला आहे. रस्ता दुपदरी असताना पळस्पे फाटा, खारपाड्याचा जुना पूल, कोलाड, माणगाव या ठिकाणी हमखास वाहतूक कोंडी होत असे. युती सरकार सत्तेवर असताना त्यावेळी चाकरमान्यांचा प्रवास सुखरूप होणार अशा गमजा मारण्यात आल्या होत्या. तत्कालीन गृहराज्यमंत्री (कै.) प्रभाकर मोरे त्यावेळी रायगडचे पालकमंत्रीही असल्याने गणेशोत्सवापूर्वी जिल्ह्यात तळ ठोकून होते. पण त्याचवेळी चाकरमान्यांचा प्रवास रेकॉर्ड ब्रेक वेळखाऊ झाला होता. मुंबईतील हजारो चाकरमानी सिंधुदुर्गात २४ तासानंतर पोहचले होते. पुढे नवीन खारपाडा पूूल झाला तरी परिस्थिती ‘जैसे थे’च राहिली. महामार्गाचा काही भाग चौपदरी झालेला असतानाही रखडत प्रवासाचे रडगाणे खड्ड्यांमुळे सुरूच आहे.

पालकमंत्र्यांनी वारंवार मार्गाची पाहणी करून केंद्र सरकारच्या अखत्यारितील प्राधिकरणाच्या संबंधित ठेकेदाराला सज्जड दम देणे हे दरवर्षींचे ठरून गेले असून, बांधकाममंत्रीही अधूनमधून एखादी भेट देत संबंधितांचे कान टोचण्याचा कार्यक्रम पार पाडत आले आहेत. कोकणात ज्या प्रमाणात पावसाचे प्रमाण आहे त्या प्रमाणात रस्त्यांचा दर्जा नसल्याने महामार्गासह इतर कोणतेही मार्ग धडपणे नाहीत. गणेशोत्सव आला की जागे होणारे आणि एरव्ही याबाबत आश्चर्यकारक मौन बाळगणार्‍या लोकप्रतिनिधींबद्दलही आता तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. चौपदरीकरण होत असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या दर्जाबद्दल आताच शंका उपस्थित केली गेली असताना त्यावरही सर्वांचे सुरुवातीपासूनचे मौन व्रत ‘बोलके’ आहे.


हेही वाचा – Corona: रत्नागिरीत १०१ नव्या रुग्णांची नोंद; ३ जणांचा मृत्यू


 

First Published on: August 11, 2020 11:44 PM
Exit mobile version