Bharadi Devi Yatra : महापौरांचे भराडीदेवीला गाऱ्हाणं ! मुंबईत पुढचा महापौर भगव्या शिवसेनेचाच

Bharadi Devi Yatra : महापौरांचे भराडीदेवीला गाऱ्हाणं ! मुंबईत पुढचा महापौर भगव्या शिवसेनेचाच

Bharadi Devi Yatra :  मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा भगव्या शिवसेनेची सत्ता येऊ देत. शिवसेनेचाच महापौर निवडून येऊ देत, असे गाऱ्हाणे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोकणातील अंगणेवाडीच्या जत्रेला उपस्थित राहून भराडीदेवीला गाऱ्हाणे घातले आहे. यासंदर्भातील माहिती थेट अंगणेवाडी जत्रेतून महापौर किशोरी पेडणेकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.

मुंबईतील व्यस्त कारभारातून आणि राजकीय घडामोडीतून महापौरांनी अंगणेवाडीच्या आपल्या लाडक्या भराडीदेवीसाठी काहीसा वेळ काढून गुरुवारी सकाळी ११ वाजता भेट देऊन भराडीदेवीचे श्रद्धापूर्वक, मनःपूर्वक दर्शन घेतले. देवीची मनोभावे ओटी भरली.

महापौरांनी भराडीदेवीच्या चरणी नेमके काय घातले गाऱ्हाणे

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंकणातील अंगणेवाडीच्या भराडीदेवीची जत्रा आल्याने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी, ‘पुन्हा एकदा भगव्या शिवसेनेची सत्ता येऊ देत. शिवसेनेचाच महापौर निवडून येऊ देत’, असे गाऱ्हाणे देवीला घातले आहे. सच्च्या मनाने, निष्ठेने केलेले कर्म हे भराडीआईला भावते. आईचा आशिर्वाद नेहमी तिच्या निस्सीम भक्तांना आणि लेकरांना असतो. भराडीआई तिच्या लेकरांना कधीच परकं करत नाही. त्यामुळे कोकणच्या लालमातीत शिवसेनेचा भगवाच फडकतच राहणार आणि मुंबादेवीच्या मुंबईतही भगवाच फडकणार, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

ज्यांच्या ( भाजपवाले) मेंदूला कोविड तो बरा कर, त्यांना सुबुद्धी दे

‘मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून थैमान घालणाऱ्या कोविडला कायमचे नष्ट कर. मुंबईकरांसह महाराष्ट्रातील जनतेचे जनजीवन सुखकर कर. तसेच, ज्यांच्या मेंदूला (भाजपवाले) कोविड झालाय, तो बरा कर, त्यांना सुबुद्धी दे’ असे गाऱ्हाणेही त्यांनी देवीला घातले आहे. यावेळी, देवीच्या पुजाऱ्यांकडून देवीचा आशीर्वादपर प्रसाद आपल्या ओंजळीत घेऊन देवीचा निरोप घेतला. महापौर आजचा दिवस भराडीदेवीच्या मूळ स्थानी निवास करणार असून शुक्रवारी त्या मुंबईला यायला निघतील.

कोकणस्थ नगरसेवकांची भराडीदेवी जत्रेला हजेरी

अंगणेवाडी भराडीदेवीच्या जत्रेला दरवर्षी कोकणस्थ नगरसेवकांची मोठ्या प्रमाणात हजेरी असते. महापौर किशोरी पेडणेकर, नगरसेवक प्रीती पाटणकर यांसह आणखीन काही कोकणस्थ नगरसेवकांनी अंगणेवाडीच्या भराडीदेवीच्या मंदिरात उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही अंगणेवाडी भराडीदेवीच्या जत्रेला शिवसेनेचे नगरसेवक व माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, तुकाराम पाटील, दिनेश कुबल, बाळ नर आदी नगरसेवकांना जायचे होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ मुंबईत मंत्रालयाशेजारील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ महाविकास आघाडीतर्फे करण्यात आलेल्या धरणे आंदोलन त्यांना उपस्थित राहावे लागल्याने अंगणेवाडी जत्रेला गुरुवारी दुपारपर्यंत तरी निघणे शक्य झाले नाही.


हेही वाचा – Aangnewadi jatra 2022 : आंगणेवाडी जत्रोत्सवाला सुरुवात, कोरोना नियमांचे पालन करत श्री भराडी देवीचा जत्रोत्सव

First Published on: February 24, 2022 2:31 PM
Exit mobile version