गिरणी कामगारांची सोडत ‘या’ दिवशी जाहीर होणार, मुंबईत घर मिळणार

गिरणी कामगारांची सोडत ‘या’ दिवशी जाहीर होणार, मुंबईत घर मिळणार

मुख्यमंत्र्यांनी दिला विश्वास

गेल्या १९ वर्षांमध्ये केवळ १२ हजार गिरणी कामगारांची लॉटरी काढल्याबाबत म्हाडाच्या कारभाराबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. गिरणी कामगारांना घर मिळावे ही बाळासाहेबांची इच्छा होती. अनेक वर्षे उलटूनही गिरणी कामगार हे घराच्या प्रतिक्षेत आहेत. वारंवार गिरणी कामगारांच्या घरांबाबत लॉटरीची घोषणा होऊनही ही सोडत का काढण्यात आली नाही असा सवाल त्यांनी यावेळी केला. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिविशेषनाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी गिरणी कामगारांच्या सोडत प्रक्रियेच्या तारखेची घोषणा केली.

मुंबईतल्या गिरणी कामगारांची अनेक दिवस रखडलेली सोडतीची घोषणा ही येत्या १ मार्चला काढण्यात येणार असल्याचे स्पष्टीकरण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. गेली अनेक वर्षे मुंबईतील गिरणी कामगार आपल्या हक्काच्या घराच्या प्रतिक्षेत आहेत. अखेर गिरणी कामगारांच्या सोडतीसाठी आवश्यक असणारी सर्व प्रक्रिया पुर्ण झाली आहे. त्यामुळे मार्चच्या सुरूवातीलाच म्हाडाकडून या प्रक्रियेची अंमलबजावणी होईल असे त्यांनी सांगितले. गिरणी कामगारांना मुंबईबाहेर घरे न देता मुंबईतच घरबांधणी करा अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मुंबईतच जागा शोधा आणि मुंबईतच घर बांधा असेही ते यावेळी म्हणाले. जागा नसेल तर शोधा, लवकरात लवकर लॉटरी काढा असेही ते यावेळी म्हणाले. म्हाडाच्या माध्यमातून गिरणी कामगारांना घर देण्यासाटी प्रयत्न करणार असल्याचेही ते म्हणाले. आजच्या बैठकीला गिरणी कामगार सेनेचे नेते बाळ खवणेकर, दत्ता इसवलकर, प्रवीण घाग आदी उपस्थित होते. तर सरकारचे प्रतिनिधी म्हणून खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत आणि शिवसेना नेते सुनिल शिंदे, शिवसेनेचे सचिन अहिर तसेच म्हाडाचे अधिकारी उपस्थित होते.

First Published on: February 23, 2020 7:54 PM
Exit mobile version