मुंबईकरांनो, आणखी दोन दिवस पावसाची शक्यता

मुंबईकरांनो, आणखी दोन दिवस पावसाची शक्यता

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईतील हवामान रविवारी देखील ढगाळ नोंदविण्यात आले. विशेषत: सकाळसह दुपारी मुंबईत बहुतांश ठिकाणी तुरळक सरींनी हजेरी लावली. विशेषत: म्हणजे येथील ढगाळ हवामान आणखी दोन दिवस कायम राहणार असून, १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश सामान्यत: ढगाळ राहील. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी तर कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बर्‍याच भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या बहुतांश भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले होते. १४ डिसेंबर रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाड्यात हवामान कोरडे राहील. १५ ते १७ डिसेंबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

First Published on: December 13, 2020 11:55 PM
Exit mobile version