दीड कोटींच्या टर्म इंश्योरेंससाठी मित्राचा खून; स्वार्थी मित्राला अटक

दीड कोटींच्या टर्म इंश्योरेंससाठी मित्राचा खून; स्वार्थी मित्राला अटक

आपल्या मृत्यूनंतर कुटुंबाला आधार मिळावा म्हणून हल्ली अनेकजण टर्म इंश्योरेंस काढतात. या टर्म इंश्योरेंसचे पैसे मिळवण्यासाठी सातारा येथे मित्रत्वाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. स्वतःच्या मृत्यूनंतर टर्म इंश्योरेंसची दीड कोटींची रक्कम मिळण्यासाठी एका तरुणाने स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचला. यासाठी आपल्याच मित्राचा खून करुन त्याला गाडीत पेटवून दिले. मात्र पोलिसांनी अवघ्या तीनच दिवसांत गुन्ह्याचा तपास करुन आरोपी सुमित सुरेश मोरेला अटक केली आहे.

सातारा येथील बोधेवाडी ते डिस्कळ रस्त्यावर असलेल्या पिराचा घाट येथे २१ जानेवारी रोजी एका गाडीत, अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. खूनाचे रहस्य उलगडल्यानंतर पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. व्यवसायात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सुमित मोरेने हे दुष्कृत्य केल्याचे समोर आले आहे. सुमितने प्रोटीन पावडर विकण्याचा व्यवसाय सुरु केला होता. मात्र त्यात त्याला मोठे नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे तो कर्जाच्या ओझ्याखाली गेला होता. त्यातून स्वतःचा दीड कोटींच्या विम्याचा फायदा उचलण्याचा निर्णय सुमितने घेतला.

मृत तानाजी आवळे (तालुका माण) हा सुमितचा मित्र होता. तानाजीची शरीरयष्टी ही थोडीफार सुमितच्या शरीरयष्टीशी मिळतीजुळती होती. त्यामुळे तानाजीचा खून करुन त्याजागी स्वतःचाच खून झाला असा बनाव रचण्याचा कट सुमितने रचला. त्याप्रमाणे तानाजीचा खूनही करण्यात आला. गाडीच्या नंबरवरुन पोलिसांनी सुमितच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. मात्र सुमितच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावर सुमित गेल्याचे दुःख दिसत नव्हते. तिथेच पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तपासाची दिशा बदलली.

तपास सुरु असतानाच सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांना सुमित जेजूरी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी सुमितला अटक केली आणि स्वतःच्या हत्येचा बनाव उघड झाला.

First Published on: January 25, 2020 2:40 PM
Exit mobile version