मुस्लिम समाज शिवरायांना मानणारा : खा. हुसेन दलवाई

मुस्लिम समाज शिवरायांना मानणारा : खा. हुसेन दलवाई

नाशिक : शिवाजी महाराजांनी मुस्लिमांचा सन्मान केला होता. त्यामुळे मराठी मुस्लिमांचा मुघलांशी काही संबंध नाही. हा समाज मुघलांना नव्हे तर शिवरायांना मानणारा आहे, असे परखड मत ज्येष्ठ नेते तथा विचारवंत माजीमंत्री हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले.

अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला संमेलनाध्यक्ष अब्दुल कादर मुकादम, ज्येष्ठ विचारवंत डॉ. अलीम वकील, कवी जावेद पाशा कुरेशी, परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजित नदाफ, प्राचार्य डॉ. फारुख शेख, डॉ. सुरेश जागीरदार आदी उपस्थित होते.
माजी मंत्री दलवाई पुढे म्हणाले की, मुस्लिम समाजाला जाणीवपूर्वक खलनायक ठरविले जात आहे. याविषयी साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून आवाज उठवायला हवा. पाकिस्तानच्या निर्मितीलाही मराठी मुस्लिमांचा पाठिंबा नव्हता. आज मुस्लिमांनी शिक्षणाचे प्रमाण वाढवण्याची गरज आहे. मदरशांमध्ये श्रीमंत मुस्लिमांच्या मुलांना पाठवावे व गरीब मुलांना शाळांमध्ये शिक्षण द्यावे, निवडणुकीत धर्मनिरपेक्ष पक्षांना मतदान करावे, उमेदवारांचा धर्म न पाहता समाजाचे भले करणार्‍याला निवडून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जोशी यांनी सांगितले की, मुस्लिम समाजात अनेक गुण आहेत. तो समाज फक्त शिक्षणाअभावी मागे राहिला आहे. आजही वृद्धाश्रमात एकही मुस्लिम आई-वडील आढळून येत नाहीत, असे संस्कार या समाजाकडे आहेत. आई-वडील किती श्रेष्ठस्थानी आहेत हे समाजाकडून शिकण्यासारखे आहे.
कार्यक्रमाचे स्वागतध्यक्ष इरफान शेख यांनी संमेलनाचे रूपरेषा विशद करताना नाशिक ही सुफी संतांची भूमी आहे. या भूमीत 9 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, अशा शब्दांत मनोगत व्यक्त केले.

इस्लामचे संपूर्ण सार कुराणमध्ये आहे. संस्कृतीपासून ते अर्थक्रांतीपर्यंत प्रत्येक गोष्टीची मांडणी त्यात केली आहे. संपूर्ण जगात पूर्वीपासून इस्लामला बदनाम केले जात आहे. महाराष्ट्रात मुस्लिमांची सुमारे 15 टक्के लोकसंख्या आहे. आजवरच्या साहित्यात मुस्लिमांना खलनायक, विदूषक या स्वरूपात सादर करण्यात आलेले आहे. त्यामुळे समाजात वेगळी प्रतिमा निर्माण होत आहे, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत अब्दुल कादर मुकादम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली.

भाषेला कुठलाही धर्म, जात नसते. जोपर्यंत माणूस भाषा वाचत नाही तोपर्यंत त्याला त्याचा अर्थ कळत नाही. त्यामुळे भाषांचा अभ्यास करणे सर्वांसाठी महत्वाचे आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झालेली आहेत तरी समग्र क्रांती झालेली नाही. समान अधिकारासाठी ज्ञानाचा प्रसार करणे आवश्यक आहे. त्यासाठी साहित्य आणि साहित्यिकांची मोलाची भूमिका आहे. पुढे त्यांनी साहित्याची प्रेरणा व प्रयोजन, मुस्लिम मराठी साहित्य भिन्नता व एकात्मता मराठी मुसलमानांच्या तीन अस्मिता व इस्लामी संस्कृतीची वाटचाल या मुद्यांद्वारे माहिती दिली. संमेलनात दिवसभरात परिसंवाद महिला कवी संमेलन, बहुभाषिक कवी संमेलन इ. कार्यक्रम झाले. प्राध्यापक मंगेश जोशी व शीतल भाटे, निलोफर सय्यद आदींनी सूत्रसंचालन केले.

संमेलनात ‘हे’ ठराव मंजूर
First Published on: January 31, 2023 5:46 PM
Exit mobile version