मविप्र : श्रीराम शेटेंची उमेदवारी नाकारल्याचे प्रचंड दु:ख – शरद पवार

मविप्र : श्रीराम शेटेंची उमेदवारी नाकारल्याचे प्रचंड दु:ख – शरद पवार

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांना सरचिटणीसपदाची उमेदवारी देण्यावरुन निर्माण झालेला वाद चव्हाट्यावर आला आहे. याविषयी बोलताना करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, काही महिन्यांपूर्वी श्रीराम शेटे यांना संस्थेच्या सरचिटणीसपदाची उमेदवारी देण्याचा आग्रह विद्यमान सरचिटणीस नीलिमा पवार यांनी धरला होता. परंतु, दोन दिवसांपूर्वी त्यांनी माझी भेट घेवून सभासदांच्या नावाखाली हा निर्णय बदलण्याचा आग्रह धरला. नीलिमा पवार यांच्या या निर्णयामुळे मी प्रचंड दु:खी झालो असल्याची जाहीर खंतही शरद पवार यांनी दिली.

शरद पवार यांच्या हस्ते मविप्र संस्थेच्या ‘बखर’ व ‘बोधामृत’ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रातील प्रचंड मोठा इतिहास असलेल्या शिक्षणसंस्थांत मविप्रचा समावेश होतो. या संस्थेच्या निवडणुकीची चर्चा सुरु असताना नीलिमा पवार व श्रीराम शेटे हे दोन महिन्यांपूर्वी माझ्याकडे आले होते. नीलिमा पवार यांनी माझ्याकडे आग्रह धरला की, श्रीराम शेटे यांनाच सरचिटणीसपदाची उमेदवारी द्यावी. माझ्या आदेशानुसार श्रीराम शेटे यांनी सरचिटणीसपदाची उमेदवारी करण्याचे मान्य केले. यानंतर सभासदांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केल्याचे समजल्यानंतर नीलिमा पवार व श्रीराम शेटे हे दोघेही दोन दिवसांपूर्वी मुंबईत आले आणि त्यांनी शेटे यांची दुसर्‍या पदासाठी उमेदवारी देण्याचा आग्रह धरला. जर सभासदांचा विरोध होता तर तुम्ही माझ्यापर्यंत येण्याची आवश्यकता नव्हती. श्रीराम शेटे यांचा स्वभाव वेगळा आहे. त्यांच्या काम करण्याची पध्दत अगदी वेगळी असल्यामुळे ते कधी जाहीरपणे बोलत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

पुस्तकांविषयी बोलताना पवार म्हणाले, मविप्र संस्थेचा इतिहास हा प्रेरणादायक असून आजच्या तरुण पिढीसाठी तो निश्चितच मार्गदर्शक ठरेल. संस्थेच्या उभारणीसाठी जुन्या पिढीने दिलेले योगदान अत्यंत महत्वपूर्ण असल्याचेही पवारांनी सांगितले. यावेळी यावेळी छगन भुजबळ, आ. दिलीप बनकर, आ. सरोज अहिरे, हेमंत टकले, देविदास पिंगळे, संस्थेच्या सरचिटणीस निलीमा पवार, अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, सभापती माणिकराव बोरस्ते, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, उपसभापती राघोनाना हिरे, संचालक नानासाहेब महाले, भाऊसाहेब खातळे, दतात्रय पाटील, उत्तमबाबा भालेराव, डॉ. विश्राम निकम, डॉ. प्रशांत देवरे, डॉ. जयंत पवार, रायभान काळे, प्रल्हाद गडाख, सचिन पिंगळे, अशोक पवार, हेमंत वाजे, माजी उपसभापती अ‍ॅड पंडितराव पिंगळे, अभिमन्यू सूर्यवंशी, प्रा. अशोक सोनवणे, प्रा. बिरारी, डॉ. एन. एस. पाटील, डॉ. एस. के. शिंदे, सीमा जाधव उपस्थित होते.

नीलिमा पवारांनीही डिवचले

प्रास्ताविकात नीलिमा पवार यांनीही शरद पवारांना डिवचले. त्या म्हणाल्या, संस्थेच्या या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्याचे प्रयोजन होते. परंतु, ते शक्य झाले नाही. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुस्तकांचे प्रकाशन करायचे नियोजन असताना शरद पवारांचे नाशिकमध्ये आगमन झाले आणि हा योगायोग जुळून आल्याचे त्यांनी सांगितल्यानंतर शरद पवार यांचा मूड चांगलाच खराब झाल्याचे बोलले गेले.

First Published on: July 30, 2022 3:01 PM
Exit mobile version