माझ्या वडिलांनाही विनाकारण 2 वर्षं जेलमध्ये ठेवलं होतं, मी घाबरत नाहीः देवेंद्र फडणवीस

माझ्या वडिलांनाही विनाकारण 2 वर्षं जेलमध्ये ठेवलं होतं, मी घाबरत नाहीः देवेंद्र फडणवीस

मुंबईः विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची काल मुंबई पोलिसांनी चौकशी केली. त्यावरूनच आज विधानसभेत जोरदार गदारोळ झालाय. माझ्या वडिलांवरही कोणताही गुन्हा नसताना इंदिरा गांधींनी त्यांना दोन वर्ष आणि काकूंना अठरा महिने जेलमध्ये ठेवलं होतं. त्यामुळे आम्ही जेल वगैरेला घाबरत नाही, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी विधानसभेत देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीबाबत निवेदन दिलं, तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांवर पलटवार केला.

मुंबई पोलिसांकडून मला एक प्रश्वावली देण्यात आली होती. त्यात मला साक्षीदार म्हणून प्रश्नांची उत्तरं देण्यास सांगण्यात आलं होतं. परंतु काल मला चौकशीदरम्यान विचारलेले प्रश्न हे आरोपी म्हणून होते. मला विचारलेले प्रश्न हे आरोपीला विचारतात तसे विचारण्यात आले होते. असे प्रश्न साक्षीदाराला विचारतात का?, माझी प्रश्नावली कोणी तरी मुद्दामहून बदलल्याचा आरोपही त्यांनी केलाय. मी अतिशय जबाबदारीनं वागलोय. तसेच मी व्हिसल ब्लोअर अॅक्टप्रमाणे सुरक्षित आहे. माझ्याकडे असलेल्या ट्रान्सस्क्रिप्ट मी केंद्रीय गृहसचिवांना दिल्या, जेणेकरून कोणाची बदनामी होऊ नये, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय.

दुसरीकडे भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या चौकशीचा मुद्दा उपस्थित करत सरकारला धारेवर धारलेय. तसेच विरोधी पक्षनेत्यांची चौकशी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणण्याचीही मागणी केलीय. त्यानंतर माहिती उघड न करण्याचा विरोधी पक्षनेत्याला अधिकार असल्याचंही आशिष शेलारांनी सांगितलंय. परंतु गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी विरोधकांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावत त्यासंदर्भात स्पष्टीकरण दिलंय.

जी नोटीस पाठवली ती आरोपी म्हणून पाठविलेली नाही, वळसे-पाटलांचं स्पष्टीकरण

मुंबई विरोधी पक्षनेत्यांना जी नोटीस पाठवली ती आरोपी म्हणून पाठविलेली नाही. त्यांना उपलब्ध झालेली माहिती कुठून मिळाली? हे जाणून घेण्यासाठी नोटीस होती. त्यांना जाणीवपूर्वक अडकविण्याचा किंवा अडचणीत आणण्याचा कोणताही हेतू शासनाचा नाही. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना 13 मार्च 2022 रोजी एका प्रकरणात साक्ष नोंदविण्यासाठी नोटीस देण्यात आली होती. त्याबद्दल आज विधानसभेत विरोधी पक्षातील आमदारांनी स्थगन प्रस्तावाद्वारे आक्षेप नोंदविला. या सर्व आक्षेपांवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सविस्तर उत्तर दिले.


हेही वाचाः Maharashtra Budget Session 2022 : १२ वी केमिस्ट्रीचा पेपर फुटला नाही, शिक्षणमंत्र्यांचे विधान परिषदेत स्पष्टीकरण

First Published on: March 14, 2022 2:51 PM
Exit mobile version