N.A.tax एकदाच भरावा लागणार; राज्य शासन घेणार निर्णय

N.A.tax एकदाच भरावा लागणार; राज्य शासन घेणार निर्णय

 

छत्रपती संभाजीनगरः दरवर्षी भरावा लागणाऱ्या अकृषी कर (N.A.tax) मधून नागरिकांची सुटका करण्याचा निर्णय राज्य शासन लवकरच घेणार आहे. त्यामुळे खरेदीच्या वेळी एकदाच हा टॅक्स भरावा लागणार आहे, अशी घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे.

क्रेडाई महाराष्ट्र २०२३-२५ च्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न जाला. त्यावेळी महसूल मंत्री विखे-पाटील यांनी ही माहिती दिली. महसूल मंत्री विखे-पाटील म्हणाले, दरवर्षीचा N.A.tax बंद केल्याने महाराष्ट्राच्या महसुलावर त्याचा परिणाम होईल. पण नागरिकांना याचा नक्कीच फायदा होईल. नागरिकांची दरवर्षीच्या जाचातून सुटका होईल.

भूमी अभिलेख विभागाकडून दिले जाणारे नकाशे १५ दिवसांत घरी पाठवले जातील. मालमत्तांचे आता डिजिटल मॅपिंग होणार आहे. यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे. गावठाण जमाबंदी प्रकल्पांतर्गत महसूल, भूमी अभिलेख आणि ग्रामविकास यांच्याकडून हे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला राज्य शाननाकडून ड्रोन दिला जाणार आहे. प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार आहे, असेही महसूल मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.

पुढे महसूल मंत्री विखे-पाटील म्हणाले, वाळूचा लिलाव बंद करण्यात आला आहे. १ मे पासून वाळू सहाशे रुपये ब्रासने डेम्पोतच मिळणार आहे. बांधकामासाठी ही वाळू दिली जाणार आहे. वाहतुकीचा खर्च धरून एक हजार रुपये ब्रास वाळू बांधकाम व्यावसायिकांना मिळावी, असे धोरण ठरवण्यात आले आहे. अवैध वाळू ठेकेदारांना चाप देण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, आगामी काळात भाजपकडून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरे असू शकतात, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी करीत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली होती. आगामी काळात काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होण्यासाठी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातही प्रयत्नशील आहेत. ती खेळी माझ्या अंदाजाने बाळासाहेब थोरात विरोधात राधाकृष्ण विखे-पाटील अशी आहे असे मी त्या ठिकाणी मानतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे आवडणार नाही, परंतु भाजपचा नवीन मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा राधाकृष्ण विखे-पाटील होऊ शकतात. त्याचबरोबर जी काही नगरमधील खेळी झाली आहे, त्यातून बाळासाहेब थोरातांनाही इच्छा झालेली दिसते की आपण काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा व्हावे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.

First Published on: April 17, 2023 12:15 PM
Exit mobile version