नाशिक जिल्ह्यात पुन्हा बैलगाडा शर्यतीचा ‘नाद खुळा’; लम्पीमुळे लादलेली बंदी उठली

नाशिक जिल्ह्यात पुन्हा बैलगाडा शर्यतीचा ‘नाद खुळा’; लम्पीमुळे लादलेली बंदी उठली

नाशिक : सध्या राज्यसह देशभरात लम्पी या जनावरांच्या आजाराने थैमान घातले आहे. सद्यस्थितीत आजाराची दाहकता कमी झाली असली तरी काही महिन्यापूर्वी लम्पी आजार वेगाने फोफावत होता. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने बैलगाडा शर्यत, यात्रांच्या ठिकाणी जनावरांचे बाजार किंवा प्रदर्शने आदींवर बंदी घातली होती. मात्र, नाशिक जिल्ह्यात लम्पी आजार नियंत्रणात आलेला असल्याने जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांनी बैलगाडा शर्यत, जनावरांचा बाजार, प्रदर्शने यावर टाकलेली बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बैलगाडा शर्यत प्रेमींमध्ये चैतन्याच वातावरण आहे. अगदी येत्या आठवड्यातच जिल्ह्यात काही ठिकाणी भव्य स्वरुपात बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात येणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.

राज्यामधील गोवंशीय जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन शाखेकडून आदेश पारित करत बंदी टाकण्यात आली होती. यामध्ये आता सुधारणा करत नव्याने आदेश काढण्यात आले आहेत. यानुसार आता नाशिक जिल्ह्यात कोठेही प्राण्यांचे बाजार, प्रदर्शन, बैलगाडा शर्यती भरून भरवता येणार आहेत. तसेच गुरांची वाहतूक देखील या उद्देशाने करता येणार आहे. मात्र, हे करत असताना केंद्र सरकारच्या वतीने घालून दिलेल्या काही मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहणार असणार आहे.

बंदी असल्यामुळे फक्त बैलगाडा शर्यतीच बंद नव्हत्या तर जिल्ह्यातील जनावरांचे बाजारही बंद होते. याचा थेट परिणाम जनावरांच्या बाजारात होणार्‍या कोट्यावधींच्या उलाढालीवर झाला. जिल्हयाभरात होणारे व्यवहार यामुळे ठप्प झाले होते. नाशिक जिल्ह्यातील घोटी, सिन्नर या ठिकाणी बैल बाजार भरवला जात होता. यावेळी खरेदी विक्रीच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत होती. मात्र यावर बंदी आल्याने ही उलाढाल ठप्प झाली होती. जिल्हाधिकारी यांनी आता बंदी उठविल्याने पुन्हा एकदा जनावरांचा बाजार जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी गजबजलेला पहावयास मिळणार आहे.

First Published on: January 4, 2023 9:06 PM
Exit mobile version