उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्याच्या प्रक्रियेला वेग

उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करण्याच्या प्रक्रियेला वेग

उस्मानाबादच्या नामांतर होण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला आहे. नामातरांसाठी आवश्यक असणारी कागदपत्रं जिल्हाप्रशासनकडून मंगळवारी विभागीय आयुक्तालयाकडे सादर केली असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना-भाजप युती असलेल्या कालावधीत १९९९ साली उस्मानाबादचं नाव बदलून ते धाराशिव करण्यात आलं होतं. दरम्यान हे प्रकरण न्यायालयात न टिकल्याने १९९९ साली केलेलं नामांतर न्यायालयाकडून रद्द करण्यात आला होता. मात्र आता ही त्रुटी दूर करून उस्मानाबादचं नामांतर धाराशिव करणार असल्याचे सांगितले जात आहे.

आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशिव झालं

मिळालेल्या माहितीनुसार, १९०२ साली निजाम सरकारने धाराशिव हे नाव बदललं आणि उस्मानाबाद करण्यात आलं. शिवसेना-भाजप युती असलेल्या कालावधीत त्याआधी असलेल्या युती सरकराच्या नामांतराचा प्रस्ताव उच्च न्यायालयात टिकला नाही, हा प्रस्ताव पुन्हा नव्याने उस्मानाबाद नगरपालिकेकडे नामांतर व्हावं, यासाठी पाठवण्यात आला होता. या प्रक्रियेकरता उस्मानाबाद नगरपालिकेचा ठराव मंजूर होणं आवश्यक होतं आणि जिल्हाप्रशासनाकडून यासंदर्भातील कागदपत्र सादर करणं बंधनकारक होतं. मात्र सत्ताधारी पक्ष सत्तेत असताना आणि गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत यासंदर्भात कोणतीही पाऊलं उचलली जात नव्हती. गेल्या काही दिवसांपूर्वी हा मुद्दा पुन्हा समोर आल्यानंतर या प्रकरणाला वेग आला. हैदराबादच्या संस्थांकडे उस्मानाबाद शहर होतं, हे शहर किती पुरातन आहे, याचे नामांतरण कधी झाले यासह नगरपरिषदेने १९६२ साली जो ठराव मंजूर केला तो नेमका काय आहे? या संदर्भातील सविस्तर माहिती असणारे दस्तऐवज विभागीय आयुक्तालयाकडे पाठविण्यात आला आहे.

असा आहे धाराशिव नावाचा इतिहास

स्कंद पुराणातील एका कथेनुसार, पूर्वी या गावात धारासूर नावाचा एक असुर (राक्षस) राहत असे. त्याच्या नावावरून गावाचे नाव धारासूर म्हणून ओळखले जायचे. धारासूरानं शंकराची आराधना करून प्रचंड शक्तीचं वरदान मिळवलं. त्यानंतर उन्मत्त होऊन त्याने लोकांना त्रास द्यायला सुरवात केली. जेव्हा सरस्वती देवीनं धारासूराचा वध केला तेव्हा तिचं नाव ‘धारासुरमर्दिनी’ झालं. अशाप्रकारे तिच्या नावावरूनच गावाचं नाव धाराशिव पडल्याची आख्यायिका आहे. राष्ट्रकूट राजवंश हा मराठवाडा-विदर्भ या भागात उदयाला आला. या राजवंशात गोविंद-तृतीय हा पराक्रमी राजा होऊन गेला. त्यावेळेच्या ताम्रपटांमध्ये धाराशीव हे नाव आढळल्याचा संदर्भ ‘धाराशिव ते उस्मानाबाद’ या पुस्तकात ज्येष्ठ पत्रकार व लेखक भारत गजेंद्रगडकर यांनी इतिहास संशोधक ब्रह्मानंद देशपांडे यांच्या मुलाखतीतून मिळाल्याचं नमूद केलं.

१९७२ साली शासनाने प्रकाशित केलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या प्रथम गॅझेटियरमध्ये देखील धाराशिव नावाचा उल्लेख आढळतो. तर महानुभाव साहित्यापासून भारत इतिहास संशोधन मंडळाने प्रसिद्ध केलेल्या साहित्यापर्यंत धाराशीवच्या नावाचा उल्लेख असल्याचेही सांगितले जात आहे.

First Published on: March 4, 2021 12:41 PM
Exit mobile version