माझ्या वक्तव्याचा विपर्यास करुन “मविआ”मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न, नाना पटोलेंचे भाजपवर आरोप

माझ्या वक्तव्याचा विपर्यास करुन “मविआ”मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न, नाना पटोलेंचे भाजपवर आरोप

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळ्यातल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाळत ठेवत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता. यावर महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद असल्याचे विरोधकांनी म्हटल आहे. नाना पटोले यांनी स्वतःच्या वक्तव्याबाबत स्पष्टोक्ती दिली आहे. माझ्या बोलण्याचा विपर्यास करुन महाविकास आघाडीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. विरोधकांनी हा डाव केला आहे मात्र त्यांचा डाव यशस्वी होणार नाही असे वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे. लोणावळ्यातील सभेत केलेल्या वक्तव्याबाबत नाना पटोलेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. विरोधकांकडून मनगढत कहाण्या बनवण्यात येत आहे. माझ्या बोलण्याचा विपर्यास करुन विरोधकांनी महाविकास आघाडीमध्ये फुट पाडण्याचा डाव सुरु केला आहे. लोणावळ्यातील सभेत कार्यकर्त्यांनी अनेक तक्रारी केल्या तसेच होणाऱ्या त्रासाबाबतही कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी कार्यकर्त्यांना सांगितले की, काँग्रेसला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्याचा रिपोर्ट रोज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे जातो. हा रिपोर्ट केवळ राज्य सरकार नव्हे तर केंद्र सरकारपर्यंत जात असतो असे नाना पटोले यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले आहे.

राज्यातील सर्व घडामोडींची माहिती राज्य आणि केंद्र सरकारकडे जात असते. प्रत्येक जिल्ह्याची नाही तर प्रत्येक विभागाचीही माहिती दिली जाते. माझ्यासह मंत्री, नेते सर्वांची माहिती राज्य सरकारकडे जात असते. याबाबत कार्यकर्त्यांना सांगत होतो सगळं समजावून सांगत होतो परंतु याचा विपर्यास केला अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली आहे.

..त्यावेळी फडणवीस घाबरले होते का?

नाना पटोले यांच्या गंभीर आरोपावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना शिवसेना-भाजपला कापरं भरलं असल्याची टीका केली आहे. यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीसांचे सरकार असताना माझे फोन का टॅप करण्यात आले. ते काय होतं त्यावेळी तुम्हाला भीती वाटत होती का? असा खोचक सवाल नाना पटोले यांनी फडणवीसांना केला आहे.

महाविकास आघाडी सरकार पुर्णवेळ चालणार

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेशी आमची दुश्मनी नाही तर आमचा विरोध भाजपला आहे. आमच्यामध्ये मतभेद नाही त्यामुळे हे सरकार पुर्ण ५ वर्षे चालणार आहे. भाजपचा सरकार पाडण्याचा प्रयत्न आहे. त्यातूनच या मनगढत कहाण्या पेरल्या जात आहेत असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. महाविकास आघाडीमध्ये नाराजी नाही केवळ सरकार पाडण्यासाठी या कहाण्या रचण्यात येत आहेत. सरकारचे काम व्यवस्थित सुरु आहेत. अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

शरद पवारांना प्रत्युत्तर देणार नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाना पटोले यांना लहान माणूस म्हणून संबोधले होते यावर नाना पटोलेंना विचारले असता त्यांनी म्हटलंय शरद पवारांना प्रत्युत्तर न देण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना आम्हाला बोलण्याचा अधिकार असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भेटायला बोलवल्यास त्यांना भेटायला जाईल काही चुकीचं बोललो नाही आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

First Published on: July 12, 2021 5:15 PM
Exit mobile version