भाजपचे नेते काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक, नाना पटोलेंचा दावा

भाजपचे नेते काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक, नाना पटोलेंचा दावा

भाजपचे नेते काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक, नाना पटोलेंचा दावा

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला लोकशाही मान्य नाही. त्यांचा कारभार ठोकशाही पद्धतीने चालतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले, या संविधानाचे रक्षण करण्याचे काम काँग्रेसने केले म्हणून एक चहावाला पंतप्रधान होऊ शकला. परंतु सत्तेत आल्यापासून मोदींनी सर्व व्यवस्थाचा मोडीत काढली आहे. देशाचा पंतप्रधान हे सर्वोच्च व सन्मानाचे पद आहे मात्र नरेंद्र मोदी यांनी या पदाची प्रतिष्ठा धुळीस मिळवली आहे, असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

शिरपूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. नाना पटोले पुढे म्हणाले की, मोदी सरकारने कोरोना संकटात देशातील जनतेला वा-यावर सोडून दिले. लोक तडफडून मरत असताना मोदी पश्चिम बंगाल मध्ये प्रचारात व्यस्त होते. लसीकरण मोहिमेच्या अपयशाने मोदींचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे. देशातील जनतेला लसींची गरज असताना मोदींनी पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्राला मोफत लस दिली आणि देशातील लोकांना मात्र लस विकत घेण्यासाठी भाग पाडले जात आहे. लसीकरण मोहिम फसली आहे परंतु प्रसिद्धीचा हव्यास लागलेल्या मोदींनी लसीकरणाचे श्रेय घेण्यासाठी कॉलेजमध्ये मोदींना धन्यवाद देणारे पोस्टर्स व होर्डींग्स लावण्याचे फर्मान काढले आहे. लोकशाही मध्ये फर्मान कसे काय काढले जाऊ शकते? मोदी सरकार हे सामान्य लोकांचे, शेतकरी, कष्टकरी लोकांचे सरकार नाही. जनता महागाईत होरपळत आहे. शेजारच्या श्रीलंका, भूतान, नेपाळमध्ये पेट्रोल ६०-६५ रुपये लिटर आहे आणि आपल्याला मात्र त्यासाठी १०० रुपये मोजावे लागत आहेत. भरमसाठ कराच्या रुपाने मोदी सरकार जनतेच्या खिशावर दरोडा टाकत आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षातील अनेक आजी माजी आमदार, नेते हे काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्यास इच्छुक आहेत. मध्यंतरी भाजपाने सीबीआय, ईडी सारख्या केंद्रीय यंत्रणामार्फत दबाव आणून भाजपात प्रवेश करण्यासाठी भाग पाडले ते भाजपात गेले असले तरी मनाने ते काँग्रेसचे आहेत त्यांच्या मनातून काँग्रेस जात नाही, असे अनेक जण काँग्रेस मध्ये येण्याच्या तयारीत आहेत.

धुळे, नंदुरबार जिल्हा हा काँग्रेस विचारांना मानणारा आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा नारळ इंदिराजी गांधी, सोनियाजी गांधी यांनी याच धुळे, नंदुरबार जिल्ह्यातच फोडला जातो. काँग्रेस पक्ष हा आदिवासी, दलित, वंचित, सामान्य लोकांना न्याय देणारा पक्ष आहे. स्वातंत्र्याची जशी चळवळ उभी राहिली होती तशीच चळवळ पुन्हा उभी करून काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून द्यायचे आहे असे आवाहन पटोले यांनी केले आहे.

उत्तर महाराष्ट्र दौ-याच्या दुस-या दिवशी शिरपूर, शिंदखेडा, दोंडाईचा येथील काँग्रेस कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी कार्यकर्ते व शेतकरी यांच्याशी त्यांनी संवाद साधला. कोरोना संकटात आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र काम केलेल्या आशा सेविकांचा दोंडाईचा येथे नाना पटोले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

First Published on: June 24, 2021 11:10 PM
Exit mobile version