राज्यातील सरकार हे स्वत:च कायदा आणि सुव्यवस्था बिघडवतंय, दसरा मेळाव्याबाबतच्या निकालानंतर पटोलेंची टीका

राज्यातील सरकार हे स्वत:च कायदा आणि सुव्यवस्था बिघडवतंय, दसरा मेळाव्याबाबतच्या निकालानंतर पटोलेंची टीका

मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबई उच्च न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. तर राजकीय वर्तुळातून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, राज्यातील सरकार हे स्वत:च कायदा आणि सुव्यवस्था बिघडवतंय, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दसरा मेळाव्याबाबतच्या निकालानंतर केली.

नाना पटोलेंनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, राज्यातील सरकार हे स्वत:च कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत आहे. विजयादशमीच्या दिवशी शिवाजीपार्कवर शिवसेनेचा दरवर्षी मेळावा होतो, जो बाळासाहेब ठाकरेंपासून होतोय. काँग्रेसच्या राजवटीत सुद्धा काँग्रेसवर टीका करायचे परंतु तरी जी परंपरा त्यांनी ठरवली, त्या परंपरेला काँग्रेस पाठिंबा दर्शवायचा. सध्या जे नवीन हिंदुहृदयमसम्राट झालेले आहेत तेच हिंदूंच्या व्यवस्थेला विरोध करताना आपण पाहत आहोत, असं नाना पटोले म्हणाले.

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही पाहीलं असेल की, या गटाचा एक आमदार गणेशोत्सवात मुंबईत स्वत: बंदुक चालवत होता. त्यावर गुन्हे दाखल झाले. बंदुकीच्या गोळ्या सापडल्या. अशापद्धतीने कायदा, सुव्यवस्था बिघडवण्याचा सरकारकडूनच प्रयत्न सुरू असेल, तर ही सगळ्यात मोठी घातक व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण झाली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर 5 ऑक्टोबरला दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती आरडी धानुका आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठाने शिवसेना आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाचे सचिव अनिल देसाई यांनी दाखल केलेली याचिका स्वीकारली.


हेही वाचा : 1 ऑक्टोबरपासून भारतात 5G इंटरनेट, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार शुभारंभ


 

First Published on: September 24, 2022 3:57 PM
Exit mobile version