भाजप भ्रष्टाचाराचे केंद्र असलेला पक्ष, नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

भाजप भ्रष्टाचाराचे केंद्र असलेला पक्ष, नाना पटोले यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

पुणे, पिंपरी चिंचवड असो वा दिल्ली भारतीय जनता पक्षात गल्लीपासून दिल्लीपर्यंत भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. भाजपाने भ्रष्टाचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या असून आरोप मात्र ते दुसऱ्यांवर करत आहेत. त्यांच्याच आशिर्वादाने स्वीस बँकेतील भारतीयांचा काळा पैसाही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टचारी वृत्तीमुळेच देश रसातळाला गेला असून भाजपा हा भ्रष्टाचाराचे केंद्र असलेल्या पक्ष आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

पुण्यात पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले म्हणाले की, देश मागील ७ वर्षांपासून अधोगतीकडे जात आहे. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेलने शंभरी पार केली आहे. या दरवाढीचे खापर काँग्रेसवर फोडून भाजपा आपली जबाबदारी झटकू पहात आहे. युपीए सरकारच्या काळातील ऑईल बाँडचे नाव पुढे करून मोदी सरकार जनतेची दिशाभूल करत आहे. पेट्रोल डिझेलच्या करातून मोदी सरकारने भरपूर नफेखोरी केली आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यातही मोदी सरकारला अपयश आलेले आहे. त्यांच्या नाकर्तेपणामुळेच कोरोनाने हजारो लोक मृत्यूमुखी पडले.

जनआशिर्वाद यात्रेचा समाचार घेताना पटोले म्हणाले की, देशात महागाई, बेरोजगारी वाढली आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहेत, त्याकडे लक्ष देण्यास भारतीय जनता पक्षाच्या सरकारला वेळ नाही. पेट्रोल डिझेलने सेंच्युरी पार केली असून आता दुसरी सेंच्युरी करण्यासाठी जनतेचा आशिर्वाद मागत असावेत. या यात्रेदरम्यान भाजपाच्या मंत्र्यांनी केलेली विधाने पाहता त्यांना जनतेचे प्रश्न सोडवण्यात रस नसून मुळ मुद्द्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत आहे. भाजपाच्या कारभाराला जनता कंटाळलेली असून आता जनताच त्यांना योग्य उत्तर देईल.

राजीव गांधी यांनी घालून दिलेल्या मार्गाने वाटचाल करु

माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथे अखिल भारतीय प्रोफेशनल कॉंग्रेसद्वारे आयोजीत कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्व. राजीवजींना अभिवादन केले व उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी पटोले म्हणाले की, स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशाला २१ व्या शतकात घेऊन जाण्याचे स्वप्न बाळगले आणि त्यादृष्टीने काम केले. डिजीटल इंडियाचा पाया त्यांनी घातला आणि भारतात दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणली. राजीव गांधी यांच्यावर त्यावेळी टीका केली गेली पण आजची दूरसंचार क्षेत्रातील भारताची प्रगती पाहता राजीव गांधी किती दूरदृष्टीचे नेते होते याची प्रचिती येते.

पुण्यात आज जवळपास १० हजार लोकांना आयटी क्षेत्रात रोजगार मिळत आहेत. जगभरातील आयटी क्षेत्रात भारताचे तरुण काम करत आहेत हे केवळ राजीव गांधी यांच्यामुळे शक्य झाले आहे. ग्रामीण भागातील गरिब मुलांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे हे हेरून त्यांनी नवोदय विद्यालयाची स्थापना केली. राजीव गांधी यांनी देशाच्या प्रगतीत दिलेले बहुमुल्य योगदान तरुण पिढीपर्यंत पोहचवण्याचे काम आपणास करावयाचे असून त्यांनी घालून दिलेल्या मार्गानेच आपण वाटचाल करु, असे नाना पटोले म्हणाले.

माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत सद्भावना क्रीडा ज्योत मशाल यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला तसेच पुणे जिल्हा शहर काँग्रेस कमिटीची आढावा बैठकही घेण्यात आली. आफ्रिकेतील किली मांजरो शिखर सर केलेल्या स्मिता घुगे यांचा सत्कार नाना पटोले यांच्या हस्ते करण्यात आला.

First Published on: August 20, 2021 10:24 PM
Exit mobile version