गोदावरील पुराचा धोका, ३३७ गावांना सतर्कतेचा इशारा

गोदावरील पुराचा धोका, ३३७ गावांना सतर्कतेचा इशारा

गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे गोदावरील नदी दुथडी भरुन वाहत असताना नांदेड मधील विष्णुपूरी धरणाचे सहा दरवाजे उघडून ८४ हजार ५४१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे गोदाकाठच्या ३३७ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित विभागाची तातडीने बैठक घेऊन त्यांनी याबाबत आढावा घेतला आहे.

आपात्कालीन यंत्रणा सज्ज

नांदेड जिल्ह्यात नांदेड शहरासह मुदखेड, धर्माबाद या तालुक्यातून गोदावरी नदी वाहते. याशिवाय, बिलोली आणि नायगाव तालुक्यातील काही गाव प्रभावित होऊ शकतात. तसेच गोदावरी नदीकाठच्या जवळपास ३३७ गावांना अशोक चव्हाण यांच्या सुचनेनुसार सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याकरता आपात्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून नदीकाठी तसेच शहरातील नदी घाटावर जीवरक्षक दल तैनात करण्यात आले आहेत. सध्या जायकवाडी, माजलगाव, मासोळी मध्यम प्रकल्प आणि सिद्धेश्वर या धरणातून गोदावरी नदीत विसर्ग सुरु आहे.

पाऊस झाला तर पूरपरिस्थिती निर्माण होईल

सध्या तरी नांदेडमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. पण, गोदावरीत विसर्ग वाढला आणि मोठा पाऊस झाला तर पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी वर्तवली आहे.
दरम्यान, रात्रीपर्यंत हा विसर्ग १ लाख ४८ हजार क्युसेकपर्यंत वाढेल. तितक्याच वेगाने विष्णुपुरीतून विसर्ग केला जाईल. पण, पुढे तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरण देखील १०० टक्के भरले आहे. त्यातूनही विसर्ग सुरु आहे. पोचमपाडच्या बॅकवॉटरचा सर्वाधिक धोका नांदेड जिल्ह्याला बसणार आहे.


हेही वाचा – ठाकरे सरकारमधील अजून एक मंत्री Corona Positive!


First Published on: September 18, 2020 6:09 PM
Exit mobile version