सन आयलाय गो, आयलाय गो… नारली पूनवेचा…

सन आयलाय गो, आयलाय गो… नारली पूनवेचा…

सन आयलाय गो, आयलाय गो… नारली पूनवेचा… मनी आंनदू मावना कोल्यांचे दुनियेचा… या गीताची आठवण करून देणारा नारळी पौर्णिमेचा सण बुधवारी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सणाचे पारंपरिक स्वरुप काही प्रमाणात बदलेले असले तरी उत्साह कायम असल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, उरण येथील करंजा, मोरा, दिघोडा येथेही मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आला. मुरुडमध्ये मिरवणुकीत सागरकन्या सोसायटीचे चेअरमन मनोहर बैले, मनोहर मकू, कोळी महिला-पुरुष उपस्थित होते.

नारळी पौर्णिमेचा हा सण आगरी, कोळी समाजासाठी फार महत्त्वाचा समजला जातो. त्यात विशेषतः कोळी समाजासाठी तर या सणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जून महिन्यापासून किनार्‍यावर नांगरून ठेवलेल्या होड्या नारळी पौर्णिमेनंतर पुन्हा मच्छिमारीसाठी रवाना होतात. वादळी वार्‍यामुळे पावसाळ्यात मासेमारीवर बंदी असते. नारळी पौर्णिमेनंतर खवळलेला समुद्र शांत होतो. या शांत झालेल्या दर्याराजाला नारळ अर्पण करून त्याच्याकडे सुख, समृद्धी, भरभराटीचे साकडे घातले जाते. त्याला शांत होण्याचे आवाहन करण्यात येते.

नारळी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी कोळीवाड्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पारंपरिक वेषात सजलेले कोळी बांधव-भगिनी मिरवणुकीने वाजत-गाजत किनार्‍यावर गेले. यावेळी त्यांच्या सोबत विशिष्ट आकाराचा आणि सजवलेला नारळ पहायला मिळाला. गेल्या काही वर्षात व्यापक प्रमाणात निघणार्‍या मिरवणुकांचे स्वरुप बदलल्याचे पहायला मिळाले. त्यासोबत कोळी बांधवांना आनंदही ओसंडून वाहत होता.

नारळ फोडीच्या स्पर्धा
नारळी पौर्णिमा आणि नारळ फोडीच्या स्पर्धा ही जुनी परंपरा आहे. पूर्वी या स्पर्धा कोळीवाड्यांसह अन्य ठिकाणी पहायला मिळायच्या. मात्र या स्पर्धांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत हळहळू कमी होत असल्याचे पहायला मिळाले.

First Published on: August 15, 2019 1:49 AM
Exit mobile version